शेती विकासाला गती: 'कृषी समृद्धी' योजनेत ५००० कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 08:58 IST2025-07-23T08:57:44+5:302025-07-23T08:58:20+5:30
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.

शेती विकासाला गती: 'कृषी समृद्धी' योजनेत ५००० कोटींची गुंतवणूक
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाढदिवसाच्या दिवशीच ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर केली असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याची माहिती नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती कोकाटे यांनी दिली. नव्या योजनेत शेतीक्षेत्रात दरवर्षी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे.
यासंदर्भात आजच अधिकृत शासकीय आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले की, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.
...अशी असणार गुंतवणूक
शेतीतील वैयक्तिक तसेच सामूहिक गुंतवणुकीच्या घटकांवर आधारित कार्यन्वित असलेल्या प्रचलित योजनांसाठी चार हजार कोटी, जिल्हास्तरीय कृषी योजनांसाठी ५००, तर राज्यातील कृषी विकासासाठी आवश्यक संशोधन व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्प आधारित योजनांसाठी ५०० कोटी अशी पाच हजार कोटींची गुंतवणूक कृषी समृद्धी योजनेसाठी असतील.
काय आहे योजना’?
कृषी समृद्धी योजना ही राज्यातील शेतीसंबंधी भांडवली गुंतवणुकीला चालना देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतीच्या एकूण उत्पादन प्रक्रियेला सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि शेतकऱ्यांना सुलभ व आधुनिक शेती व्यवस्थापनासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहे.