आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:26 IST2023-10-05T13:26:53+5:302023-10-05T13:26:53+5:30
'एनडीएमध्ये कुणाचाही आवाज ऐकला जात नाही, आमचा लढा त्याच विचारसरणीविरोधात आहे.'

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले...
Maharashtra Politics: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. भविष्यात काय होईल, याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एनडीए आणि इंडिया आघाडीवरही भाष्य केले.
आदित्य ठाकरे गुरुवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आदित्य यांनी अनेक प्रश्नांची स्पष्टपणे उत्तरे दिली. त्यांना विचारण्यात आले की, एनडीए आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीची स्थापना फक्त पंतप्रधान मोदींचा विरोध करण्यासाठी झाली आहे. यावर उत्तर देताना आदित्य म्हणाले, हे साफ चुकीचे आहे. इंडिया आघाडीतील पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. तरीदेखील सर्वांनी एकत्र येऊन आघाडी केली.
ते पुढे म्हणतात, इंडिया आघाडीत सर्वांचा आवाज ऐकला जातो. एकच व्यक्ती सर्व निर्णय घेत नाही. एनडीएमध्ये सर्व निर्णय एकच व्यक्ती घेते. तिथे कुणाचाही आवाज ऐकून घेतला जात नाही. इंडिया आघाडीचा लढा याच विचारसरणीच्या विरोधात आहे. यावेळी आदित्य यांना विचारण्यात आले की, ते 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक? या प्रश्नाच्या उत्तरात आदित्य म्हणाले की, या संदर्भात सर्व निर्णय पक्ष घेईल. पुढील निवडणुकीत महाराष्ट्रात आमचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.