संजोग वाघेरे यांचा भाजपा प्रवेश होताच आदित्य ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सत्तेची चटक...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:52 IST2025-12-21T13:50:22+5:302025-12-21T13:52:20+5:30
Aaditya Thackeray News: निष्ठावंत म्हणून जे आपल्यासोबत राहिले, त्यांच्यासोबत जनता असतेच. काही लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाण्याची सवय लागलेली असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

संजोग वाघेरे यांचा भाजपा प्रवेश होताच आदित्य ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सत्तेची चटक...”
Aaditya Thackeray News: भाजपने शनिवारी उद्धवसेना आणि शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांना प्रवेश देऊन दोघांना एकाचवेळी धक्का दिला. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक सचिन दोडके, पुण्यातील मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेची चटक लागलेले पटापटा पळून गेले. मात्र, सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या मागे पळण्यापेक्षा जी जनता सत्ता देते, त्यांच्या सोबत राहणे महत्त्वाचे असते. त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही. निष्ठावंत म्हणून जे आपल्या सोबत राहिले, त्यांच्या सोबत जनता असतेच. ज्यांना गुलाम बनायचे ते जातील, जाणाऱ्यांच्या विचार करू नका. पक्षाकडून ज्यांना जास्त पदे, प्रेम आशीर्वाद मिळाले, ते सोडून गेले. त्यांना आरशात स्वतःकडे बघताना काय वाटत असेल. काही लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाण्याची सवय लागलेली असते, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत
सरकारचे काम चांगले असते तर हेलिकॉप्टर मधून पैशांच्या बॅगा आणून पैसे वाटायची गरज पडली नसती. जनता त्रस्त आहे, ते पर्याय शोधत आहेत. गुलाम म्हणून सरकार सोबत राहिचे की जनतेसोबत राहिचे हे आता आपण ठरविले पाहिजे. पर्याय आपण दिला पाहिजे. बहुमताने सरकार आल्याचे म्हणतात, परंतु लोकांनी आमदार निवडून दिले की निवडणूक आयोगाने हा प्रश्न पडत आहे. सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रूपयांचे दिलेले आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, असे सांगत महायुती सरकारवर टीका केली.
दरम्यान, शहरीकरण वाढत असून लोकसंख्या वाढत आहे. वाढणारे तरूण शांत बसणारे नाहीत. जगभरात आंदोलनासह मतदानातून बदल होत आहे. जनता स्वच्छ लोकांना निवडेल. ती स्वच्छ लोक आपल्याकडे आहेत. बदल घडवायला आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे. बदल घडविण्यासाठी आत्मविश्वासाने उभे राहा. जनता तुमच्या पाठीशी उभी राहील, आशीर्वाद देईल. काही प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र, जिंकण्याचे गणित पाहूनच उमेदवार दिले जातील. त्यासाठी समजूतदारपणा दाखविण्याची आवश्यकता आहे. सगळेच चांगले असतात. मात्र, एकच उमेदवार निवडायचा असतो. मात्र, ज्याला उमेदवारी मिळेल, उमेदवार हा फक्त मशाल आहे हे पाहून सर्वांनी काम करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.