'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:22 IST2025-08-03T06:21:30+5:302025-08-03T06:22:16+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यात अर्बन नक्षलवाद या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली असून, प्रकल्पविरोधी आंदोलन व जनसुरक्षा कायद्यावरून शनिवारी वाद पेटला

'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
पनवेल : रायगड जिल्ह्यात औद्योगिक आणि इतर प्रकल्प येऊ घातले. त्यासाठी जमिनी घेण्यात येत आहेत. मात्र, याविरोधात आंदोलन केल्यास, सरकारविरोधात बोलल्यास सरकार अर्बन नक्षलवादी संबोधून कारवाई करेल, एखाद्याला अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आव्हान मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. शेकापच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या कार्याक्रमात शनिवारी ते बोलत होते.
मराठी माणसाचा सन्मान ठेवावाच लागेल
महाराष्ट्रात सरकारला महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. मराठी माणसाला डावलल्यास रोषाला सामोरे जावेच लागेल, असा इशाराही राज यांनी दिला. मराठी माणसाच्या थडग्यावर तुम्हाला उद्योग उभे करू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान ठेवावाच लागेल. रायगडच्या शेतकऱ्यांनी जमिनी परप्रांतीयांना देऊ नयेत, उद्योगांना जमिनी दिल्यास भागीदारी मागा, असे आवाहनही त्यांनी केले.
अर्बन नक्षलीसारखे कराल तर अटक होईल : मुख्यमंत्री
जे लोक कायद्याच्या विरोधात आहेत त्यांच्याकरिता हा जनसुरक्षा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात कायदा नाही, सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही तर तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शनिवारी नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
अजून एक भाषा शिकायला मिळाली तर काय वावगे?
मुख्यमंत्री म्हणाले, माझं पक्कं मत आहे, की महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती अनिवार्य आपण केलीच आहे. पण, मराठी मुलांना अजून एक भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगे आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेच्या पायघड्या घालायच्या त्या मानसिकतेला माझा विरोध आहे.
पुण्याच्या उद्योगात दादागिरी पाहायला मिळते. विविध पक्षांचे लोक दादागिरी करतात. ती तर मोडून काढणारच आणि जो मदत करेल त्यांचे स्वागत करणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.