- पृथ्वीराज चव्हाण(माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्रबुधवारी सकाळी-सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अपघाताची धक्कादायक बातमी कानावर पडली. क्षणभर विश्वासच बसेना; पण अशा बातम्या दुर्दैवाने कधी खोट्या ठरत नाहीत!
नोव्हेंबर २०१० मध्ये आम्ही दोघांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्रे सांभाळली. जवळपास साडेचार वर्षे एकत्र काम केले. दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बऱ्याच अडचणींच्या निर्णयात त्यांनी मला साथ दिली. आमच्यात मतभेद झाले; मात्र तरीही अनेक निर्णय आम्ही महाराष्ट्राच्या हिताचेच घेतले. शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे अजितदादांचे गुण वाखाणण्यासारखे होते. कुठल्याही बैठकीला ते कधीही उशिरा येत नसत. बैठकीत बारीक लक्ष असे. बैठक संपवताना ठोस निर्णय घेऊनच पुढे जात असत. अफाट निर्णय क्षमता असलेले करारी अजित पवार हे कार्यकर्त्यांचे नेते होते. मी मुख्यमंत्री असताना काही घटना घडल्या आणि चिडून त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले. काही दिवसांनी मी समजूत काढली आणि त्यांना परत मंत्रिमंडळात घेतले. आम्ही दोघांनी आमचा कार्यकाळ पूर्ण केला.
अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. आता दोन्ही गट एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अशा निर्णायक घटकेला अजितदादांना पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नव्हते; पण पुन्हा नव्याने कंबर कसून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ते सक्रिय झाले होते. नव्या आघाड्या, नवी समीकरणे मांडून काँग्रेसशी आघाडी करायला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी काँग्रेससोबत त्यांचे आघाडीचे प्रयत्न होते. आम्ही मात्र त्यांच्यासोबत अधिकृत आघाडी करू शकलो नाही; परंतु मला खात्री होती की, एक ना एक दिवस जुन्या काँग्रेस विचारांची मंडळी एकत्रित येतील आणि देशात दोनच विचारधारा राहतील. एक उजवी विचारधारा त्याचे प्रतिनिधित्व भाजपकडे आहे; आणि दुसरी फुले, शाहू, आंबेडकरांची समतेवर आधारित विचारधारा. शरद पवार, अजित पवार या दुसऱ्या बाजूलाच असतील याची खात्री होती. अजितदादा भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले होते; मात्र त्यांच्या विचारांशी सहमत झाले नव्हते. आज बारामतीमधील दुःखद घटना ऐकल्यानंतर लाखोंचा जनसमुदाय एकत्रित झाला आहे. महाराष्ट्राच्या मनात वेदनेचा आक्रोश आहे. आम्ही कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.
Web Summary : Prithviraj Chavan recalls working with Ajit Pawar, highlighting his discipline, punctuality, and ability to make firm decisions. Despite differences, they prioritized Maharashtra's interests. Chavan believed Pawar would eventually align with secular ideologies, even after his alliance with BJP. The state mourns his loss.
Web Summary : पृथ्वीराज चव्हाण ने अजित पवार के साथ काम करने को याद करते हुए उनकी अनुशासन, समयनिष्ठा और ठोस निर्णय लेने की क्षमता पर प्रकाश डाला। मतभेदों के बावजूद, उन्होंने महाराष्ट्र के हितों को प्राथमिकता दी। चव्हाण का मानना था कि पवार अंततः धर्मनिरपेक्ष विचारधाराओं के साथ जुड़ेंगे, भाजपा के साथ गठबंधन के बाद भी। राज्य उनके नुकसान पर शोक मनाता है।