राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 00:47 IST2025-05-24T00:45:23+5:302025-05-24T00:47:40+5:30

Railway Ticket Black Market Racket: एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटे खरेदी करून त्यांचा काळाबाजार करणाऱ्या संजय चांडक आणि प्रसादची चौकशी केली असता या दोघांचा मुंबईतील कुख्यात ठाकूर टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले.

A racket involved in black marketing of railway tickets has been busted in the state, with connections to the notorious Thakur gang in Mumbai. | राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

नरेश डोंगरे, नागपूर
रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूट करण्यासाठी राज्यभरात रेल्वेतिकिटांच्या काळाबाजाराचे रॅकेट चालविणाऱ्यांचा छडा लावण्यात मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाला गुरुवारी यश आले. मलकापूर येथील पब्लिक रिझर्व्हेशन सेंटरवर (पीआरसी) केलेल्या कारवाईनंतर या टोळीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली असून, पकडण्यात आलेल्या दोघांचे मुंबईतून रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात ठाकूरसोबत कनेक्शन असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मलकापूरच्या पीआरसी केंद्रावर रेल्वे तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असल्याची अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा होती. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कारवाईसाठी अनेक दिवसांपासून सापळा लावला होता. या सापळ्यात दोघांना अडकविण्यात या पथकाला गुरुवारी यश आले. 

पीआरसीवर संशयास्पद हालचाली करताना पथकाने संजय चांडक आणि प्रसाद नामक दोन दलालांना ताब्यात घेतले. त्यांनी तत्काळमधून एसी कोचची ३९६० रुपयांची तिकिटे खरेदी केली होती. 

वाचा >>वैष्णवी हगवणे मृत्यू : बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या?

ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीतच ते गडबडले. त्यानंतर त्यांची आणि त्यांच्या बैठकस्थळांची तपासणी केली असता पथकाला १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची तब्बल १८२ रेल्वे तिकिटे आढळली. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटे खरेदी करून त्यांचा काळाबाजार करणाऱ्या संजय चांडक आणि प्रसादची चौकशी केली असता या दोघांचा मुंबईतील कुख्यात ठाकूर टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. हा ठाकूर संपूर्ण राज्यात रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचे नेटवर्क चालवितो, अशी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना शंका आहे.

चांडकची ठाकूर सोबतची 'चॅट हिस्ट्री' उघड

संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, संजय चांडक कुख्यात ठाकूर गँगशी सलग कनेक्ट असल्याचे भक्कम पुरावे पुढे आले आहे. चांडकच्या मोबाइलवरून मुंबईतील ठाकूर गँगसोबत झालेली व्हॉटस्ॲप चॅटची हिस्ट्रीही कारवाई करणाऱ्या पथकाच्या हाती लागली आहे.

मलकापुरातून बुकिंग, मुंबईतून विक्री

पीआरएस मलकापूरमधून बुक करण्यात आलेल्या १८२ जेसीआर (जर्नी कम रिझर्व्हेशन)च्या तिकिटांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यात १ लाख, ६१ हजार ५३५ रुपयांच्या २३ लाइव्ह तिकिटांचा आणि ८ लाख, ४८ हजार, २९८ रुपयांच्या १५९ जुन्या तिकिटांचा समावेश आहे. 

अर्थात ही सर्व तिकिटे मलकापूर येथून बुक करून ती मुंबईतील दलालांना विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

२३ तिकिटे ब्लॉक; सर्वांत मोठी कारवाई

पकडण्यात आलेल्या या दलालांकडून जप्त करण्यात आलेली २३ लाइव्ह तिकिटे ब्लॉक करण्यात आली आहे. तर, चांडक आणि प्रसाद या दोघांविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा व्यवस्थित तपास झाल्यास मुंबईतून देशभरात रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचा गोरखधंदा करणाऱ्या रॅकेटचा छडा लागू शकतो.

Web Title: A racket involved in black marketing of railway tickets has been busted in the state, with connections to the notorious Thakur gang in Mumbai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.