"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:54 IST2025-05-04T15:53:30+5:302025-05-04T15:54:31+5:30
Harshvardhan Sapkal News: भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
परभणी - भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
सामाजिक सलोखा व सद्भाव वाढीस जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीत आज सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळी पोखर्णी येथे नृसिंहाचे दर्शन घेऊन सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. परभणीतही अशाच एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी ही काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे. याआधी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली तर काल परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आला आणि आज परभणीत सद्भावना यात्रा काढली आहे.
यावेळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना व सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरु आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतक-यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही.
आज सद्भावना यात्रेच्या सकाळच्या सत्रात ८ किलोमीटर तर दुपारच्या सत्रात ८ किलोमिटर पदयात्रेचा कार्यक्रम असून संध्याकाळी माहेर मंगल कार्यालय येथे मुक्काम होईल व उद्या सोमवारी ५ मे रोजी परभणी शहरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथली यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव यात्रा व अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलन संपन्न होणार आहे.