बंदुकीच्या मार्गाने खूप काही गमावले, मुख्य प्रवाहात या, आत्मसमर्पित माओवादी नेता 'भूपती'चे भावनिक आवाहन
By संजय तिपाले | Updated: November 19, 2025 11:02 IST2025-11-19T11:01:50+5:302025-11-19T11:02:00+5:30
Gadchiroli Naxal News: आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने १९ रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 'बंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या', असे भावनिक आवाहन त्याने केले आहे.

बंदुकीच्या मार्गाने खूप काही गमावले, मुख्य प्रवाहात या, आत्मसमर्पित माओवादी नेता 'भूपती'चे भावनिक आवाहन
गडचिरोली - माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व जहाल नक्षल कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे उर्फ राजक्का आणि इतर चार माओवादी १८ नोव्हेंबरला छत्तीसगड- आंध्रप्रदेश सीमेवर चकमकीत ठार झाले. माओवादी चळवळीला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सुरक्षा दलाच्या या कारवाईनंतर आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने १९ रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 'बंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या', असे भावनिक आवाहन त्याने केले आहे.
शेकडो जवान व निष्पाप नागरिकांच्या हत्येचा मास्टमाईंड व पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा प्रमुख जहाल नेता माडावी हिडमा याला आंध्रप्रदेशच्या अल्लुरी सीमेवरील सीतारामजू जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा यंत्रणेनेे कंठस्नान घातले. माओवादविरुध्द लढाईतील ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जाते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर
सीपीआय (माओवादी) चा माजी प्रवक्ता व सर्वोच्च नेता असलेल्या वेणुगोपाल उर्फ भूपतीने जुन्या साथीदारांना थेट आणि भावनिक आवाहन करत 'हिंसा सोडा, संविधानाचा मार्ग स्वीकारा' असे सांगितले आहे.
सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्याने स्पष्ट केले. 'बंदुकीच्या मार्गाने काही साध्य झाले नाही; फक्त जीव गमावले जात आहेत. जग प्रगती करत आहे, देश बदलत आहेे. संविधानातच शक्ती आहे, बंदुकीत नाही, असे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले. दीर्घ लढ्याची अनुभूती सांगताना तो म्हणतो, आता लोकांच्या प्रश्नांसाठी घटनात्मक चौकटीतूनच लढा द्यावा लागणार आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने इच्छुक माओवादी कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधण्यासाठी पुन्हा आपला मोबाईल क्रमांक जाहीर करत, मुख्य प्रवाहात यावे, असे खुले आवाहन केले.
'भूपती'ने ६० सहकाऱ्यांसह केले होते आत्मसमर्पण
१५ ऑक्टोबर रोजी माओवादी नेता भूपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली येथे आपल्या ६० सहकाऱ्यांसह माओवादी चळवळीतील प्रवासाला पूर्णविराम देत संविधानाचा मार्ग स्वीकारला होता. महाराष्ट्रात माओवादाविरुध्दच्या लढाईतील हे सर्वांत मोठे आत्मसमर्पण मानले जात आहे. यानंतर छत्तीसगडमध्येही शेकडो माओवाद्यांनी शस्त्र सोडत मुख्य प्रवाहात येणे पसंत केले.