निढोरीतून आदमापूरकडे दुधाच्या घागरींची जल्लोषी मिरवणूक, भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 21:43 IST2026-03-15T21:42:58+5:302026-03-15T21:43:40+5:30
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरु बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त अभिषेक व महाप्रसादातील खिरीसाठी लागणाऱ्या दुधाच्या घागरींची जल्लोषी मिरवणूक निढोरीतून आदमापूरकडे काढण्यात आली.

निढोरीतून आदमापूरकडे दुधाच्या घागरींची जल्लोषी मिरवणूक, भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण
मुरगूड - अनिल पाटील
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरु बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त अभिषेक व महाप्रसादातील खिरीसाठी लागणाऱ्या दुधाच्या घागरींची जल्लोषी मिरवणूक निढोरीतून आदमापूरकडे काढण्यात आली. भक्तीमय वातावरणात रथामधून या घागरी अत्यंत श्रद्धापूर्वक रवाना करण्यात आल्या. या सोहळ्यात सेवेकरी भाविक, विविध मंडळे तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भंडाऱ्याच्या दिवशी प्रसादासाठी वापरले जाणारे दूध संत सदगुरु बाळूमामा यांनी जतन केलेल्या आजच्या पिढीतील मेंढ्या-बकऱ्यांपासून संकलित करण्यात आले. महाराष्ट्र व कर्नाटकातील १९ ठिकाणी असलेल्या बग्ग्यांमधील मेंढ्या-बकऱ्यांचे दूध वाहनांद्वारे निढोरी येथील मारुती मंदिरात आणण्यात आले. येथे घागरींचे विधिवत पूजन करून त्या रथामध्ये ठेवण्यात आल्या. मानाच्या बैलगाड्या व घोड्यांच्या उपस्थितीत जल्लोषात हा रथ आदमापूरकडे रवाना झाला.
दुपारी दीड च्या सुमारास निढोरीत रथाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, तरुण मंडळे व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रथ मार्गावर नक्षीदार रांगोळ्या, रंगीबेरंगी फुलांची पखरण, कीर्तन-प्रवचने, टाळ-मृदंगांचा गजर, ढोल-ताशांचा नाद आणि डॉल्बीच्या दणदणाटात भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. हरळी बुद्रुक येथील पांडुरंग पाटील यांची मानकरी बैलजोडी अग्रभागी होती, तर औरनाळची दिंडीही या सोहळ्यात सहभागी झाली होती.
स्थानिक सेवेकऱ्यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत खिचडी, फळे, ताक व कोकम सरबत यांचेही वाटप करण्यात आले. दरम्यान, बग्गीतून आलेल्या दुधाच्या घागरींचे मुरगूड बाजारपेठेतील आत्मरूप गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात स्वागत व पूजन करून त्या पुढे निढोरीकडे रवाना करण्यात आल्या. या मिरवणुकीदरम्यान मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली.
५० वर्षांहून अधिक परंपरा
निढोरी गावातून आदमापूर देवस्थानाकडे दुधाच्या घागरी नेण्याची परंपरा गेली ५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. या परंपरेची सुरुवात स्वतः संत बाळूमामांनी केल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. निढोरीतील हनुमान मंदिर याचे साक्षीदार मानले जाते.
रथावर २५ टन भंडाऱ्याची उधळण
बाळूमामांच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात निढोरीतून आदमापूरकडे रथ मार्गस्थ झाला. यावेळी भाविकांनी ७ ते ८ जेसीबींच्या साहाय्याने तब्बल २५ टन भंडाऱ्याची मुक्त उधळण करत उत्सवाचा जल्लोष अधिकच रंगतदार केला.
हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
निढोरी मधून निघालेल्या रथ उत्सवावर आणि बाळूमामाच्या मंदिराच्या अवतीभोवती हेलिकॉप्टर मधून मोठ्या प्रमाणामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली . हेलिकॉप्टरमध्ये पुष्पवृष्टी होणार याबाबत लोकांच्या मध्ये प्रचंड उत्सुकता होती. बिद्री येथील महाविद्यालयाच्या पटांगणावरती हे हेलिकॉप्टर लँड झाले होते.तेथून टेकऑफ घेऊन त्याने अनेक वेळा पुष्पृष्टी केली.