मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांना दणका; दीड कोटींचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 11:32 IST2025-09-28T11:32:00+5:302025-09-28T11:32:22+5:30
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ; परिवहन विभागाचा इशारा

मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांना दणका; दीड कोटींचा दंड वसूल
मुंबई : परिवहन विभागाने (आरटीओ) ठरवून दिलेले भाडे आणि नियमांचे उल्लंघन करणे रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाच महागात पडले आहे. अशाप्रकारे मनमानी कारभार करणाऱ्या चालकांवर आणि अवैध बाइक टॅक्सीवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत एमएमआरटीए क्षेत्रामध्ये मोटार वाहन कायद्याचे, तसेच निश्चित केलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केलेल्या सुमारे ७,१५२ रिक्षा आणि टॅक्सीवर कारवाई करत एक कोटी साठ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबईसह संपूर्ण महानगर क्षेत्रामध्ये ॲपआधारित रिक्षा टॅक्सी चालकांची मनमानी भाडे आकारणी सुरू आहे. परिवहन विभागाने काही दिवसांपूर्वी ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना ईलेक्ट्रिक बाइक टॅक्सी आणि चारचाकी टॅक्सी सुरू करण्याचे तात्पुरते परवाने दिले आहेत. असे असतानाही निश्चित केलेले दर आणि नियमांचे त्यांच्याकडून वारंवार उल्लंघन होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुन्हे
ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे खासगी दुचाकी वाहने चालविण्यात येत आहे. अशाप्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२६३ अनधिकृत बाइक टॅक्सीच्या कारवाईत ३ लाख ८८ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच, भविष्यात ऑटोरिक्षा / टॅक्सी परवानाधारकांनी तसेच ॲप बेसद्वारे संचालन करणाऱ्या वाहनांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे, नियमांचे किंवा अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ॲप आधारित टॅक्सी सेवेवर अधिक लक्ष
परिवहन विभागाने गेल्या पाच महिन्यांत केलेल्या कारवाईची माहिती प्रसिद्ध करत ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीना नियमभंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
असे आहे भाडे (प्रतिकिमी रुपयांत)
इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी १०.२७
ऑटोरिक्षा १७.१४
काळी-पिवळी तसेच टॅक्सी २०.६६
ॲपआधारित, वातानुकुलित काळी-पिवळी आणि इतर टॅक्सी २२.७२