सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:59 IST2025-06-19T19:59:40+5:302025-06-19T19:59:57+5:30

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे.

A 17-year-old boy drowned in the sea on Satpati beach, five friends were saved! | सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!

सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!

हितेन पाटील

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातपाटी येथील मुस्लिम मोहल्ल्यामधून क्रिकेट खेळायला गेलेल्या सहा मुलांपैकी एक १७ वर्षीय तरुण, उमेद इम्रान शेख, समुद्रात पोहताना लाटांच्या तडाख्यात वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे पाच मित्र सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपाटीच्या मुस्लिम मोहल्ल्यातील सहा तरुण मुले सातपाटी-शिरगाव दरम्यानच्या समुद्रकिनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होती. याच वेळी समुद्राला मोठी भरती आल्याने महाकाय लाटा उसळत होत्या. या उसळत्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह झाल्याने या सहा मित्रांनी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र, दुर्दैवाने १७ वर्षीय उमेद शेख हा लाटांच्या तडाख्यात सापडला आणि समुद्रात वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.

मुलगा समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच, सातपाटी सागरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुणांसह काही मच्छिमारांनी उमेदचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु समुद्रातील प्रचंड मोठ्या लाटांमुळे त्याचा शोध घेणे कठीण बनले होते. सुमारे चार तास शोधमोहीम चालवूनही यश न मिळाल्याने ती थांबवण्यात आली.

समुद्रातील भरतीचे पाणी ओसरल्यानंतर मृतदेहाचा शोध घेणे सोपे होईल, अशी अपेक्षा असल्याने पोलीस आणि स्थानिक नागरिक समुद्राला ओहोटी लागण्याची वाट पाहत होते. पालघरमध्ये सुरू असलेल्या खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Web Title: A 17-year-old boy drowned in the sea on Satpati beach, five friends were saved!