९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:40 IST2025-11-27T06:36:41+5:302025-11-27T06:40:26+5:30
उपचारासाठी एखादा जखमी बिबट्या आल्यास त्यास जागाही उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. वाघांसाठी उभारलेल्या दोन्ही ‘एन्क्लोझर’मध्येही बिबटे ठेवले आहेत.

९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
अझहर शेख
नाशिक : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वनविभागाकडून सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहेत. मात्र, पिंजऱ्यातले बिबटे सोडायचे कोठे? हा यक्षप्रश्न वनविभागापुढे उभा राहिला आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ९१ बिबटे सध्या पिंजऱ्यात कैद आहेत.
बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचे पुनर्वसन केले जाते. या केंद्राची क्षमता २५ आहे. जुन्नर वनपरिक्षेत्रातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रातसुद्धा क्षमतेपेक्षा जास्त बिबटे आहेत, तसेच नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव रेस्क्यू सेंटरचीही क्षमता २० असून सध्या ३० बिबटे येथे आहेत. नाशिकच्या टीटीसीमध्ये दहा वन्यप्राणी ठेवण्याची क्षमता असून सध्या येथे तीन बछड्यांसह १५ बिबटे आहेत. उपचारासाठी एखादा जखमी बिबट्या आल्यास त्यास जागाही उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. वाघांसाठी उभारलेल्या दोन्ही ‘एन्क्लोझर’मध्येही बिबटे ठेवले आहेत.
राज्यातील सर्वच रेस्क्यू सेंटर हाऊसफुल झाले आहेत. जेरबंद केलेल्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. - जी. मल्लिकार्जुन,
मुख्य वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त.