"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 20:17 IST2025-11-18T20:16:19+5:302025-11-18T20:17:23+5:30
"आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहे. पुढे काहीही होऊ शकते," असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र यातच, महायुतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील ऑपरेशन लोटस मुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री शिंदे वगळता, त्यांचे मत्री मात्र गैरहजर राहिले. यासंदर्भात बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंत्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे वीस आमदार फुटत होते. पण त्यावेळी त्यांनी पॅचअप केले गेले. मात्र, त्यांच्यात अजूनही खदखद आहे," असा दावा चंद्रकांत खैरे यानी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
खैरे म्हणाले, "८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे वीस आमदार फुटत होते. परंतु त्यावेळी त्यांनी पॅचअप केले गेले. मात्र, त्यांच्यामध्ये अजूनही खदखद आहेच. आता जेव्हा त्यांना दिसून आले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्याला निधी देत नाहीत, मग तिथून तो राग आणि रोष वाढला आणि यामुळे ते गडबड करायला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे, हे तेथे टिकू शकणार नाहीत. ते बाहेर पडतील अथवा बाहेर जावे लागेल." एवढेच नाही तर, "आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम करत आहे. पुढे काहीही होऊ शकते," असे चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.
शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंंत्र्यांची भेट -
महत्वाचे म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट होत असते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला, उपमुख्यमंत्री शिंदे वगळता त्यांचे सर्व मंत्री अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे, कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन, त्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय तोडगा निघाला? -
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसंदर्भात बोलताना शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, "महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यांनी मित्रपक्षांचे कोणतेही नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेऊ नये, असे ठरले आहे. प्रदेशाध्यक्ष आणि इतर पक्षातील नेते बसून निर्णय घेतील. पण, सामोपचाराने तोडगा निघालेला आहे. कुणी कुणाला काहीही सुनावलेलं नाहीये. काही गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही. काही कळत-नकळत घडतात. विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे."