आरोग्य विभागात ७५ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकची ‘ॲलर्जी’
By सोमनाथ खताळ | Updated: February 6, 2025 11:29 IST2025-02-06T11:27:45+5:302025-02-06T11:29:13+5:30
-सोमनाथ खताळ बीड : अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी सर्व संस्थांसह कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली; परंतु आरोग्य विभागातील ...

आरोग्य विभागात ७५ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकची ‘ॲलर्जी’
-सोमनाथ खताळ
बीड : अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी सर्व संस्थांसह कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली; परंतु आरोग्य विभागातील ९७ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांपैकी केवळ २२ हजार लोकच अंगठा लावून हजेरी नोंदवितात. त्याचा टक्का केवळ २२ इतका आहे. ७५ हजार जणांना ‘ॲलर्जी’ असल्याचे समाेर आले आहे. असे असतानाही या सर्वांचे वेतन नियमित अदा केले जात आहे. त्यामुळेच राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र काढून अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
कर्तव्य एका ठिकाणी, हजेरी दुसरीकडेच
अनेक डॉक्टर, कर्मचारी हे कर्तव्याचे ठिकाण एक असले तरी हजेरी मात्र दुसऱ्याच संस्थेत नोंदवत असल्याचे समोर आलेले आहे. बीडमध्ये तर काही लोकांनी बायोमेट्रिक मशीनच घरी नेली होती. तर काहींनी खोटे शिक्के तयार करून घेत शिपायांमार्फत हजेरी लावलेली आहे.
बायोमेट्रिक प्रणालीत आता अपडेट काय होणार?
कामचुकारांना लगाम घालण्यासाठी आता ही प्रणाली अपडेट केली जात आहे. ज्या संस्थेत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत, तेथेच जाऊन हजेरी नोंदवायची आहे. त्याचे लोकेशन आणि आधारही संलग्न केले जाणार आहे. दुसऱ्या ठिकाणी हजेरी नोंदविल्यास ते समजणार आहे तसेच फेस रीडिंगही होणार आहे. यासाठी एईबीएएस हे ॲप डाऊनलोडची सुविधा केली आहे.