राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी 5 कोटींचा निधी, धनंजय मुंडेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 08:45 PM2022-04-27T20:45:52+5:302022-04-27T21:30:00+5:30

Dhananjay Munde : राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाच्या कृतज्ञ भावातून हे कृतज्ञता पर्व साजरे करत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

5 crore fund for organizing Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Gratitude Festival, information of Dhananjay Munde | राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी 5 कोटींचा निधी, धनंजय मुंडेंची माहिती

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या आयोजनासाठी 5 कोटींचा निधी, धनंजय मुंडेंची माहिती

googlenewsNext

मुंबई : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या येत्या 6 मे रोजी येणाऱ्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात 'लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व' चे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत कोल्हापूर जिल्हा प्रशासनास 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कोल्हापूरच्या संकल्प सभेत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी चार दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेची अवघ्या चारच दिवसात अंमलबजावणी केली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी आज जारी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी कार्यक्रम आयोजन बाबत सुचवले होते, त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही याबाबत सूचना केली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील पत्राद्वारे धनंजय मुंडे यांना राजर्षी शाहू महाराजांच्या 100व्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात स्मृती शताब्दी कार्यक्रमांचे आयोजनसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्याची धनंजय मुंडे यांना विनंती केली होती. 

लोककल्याणकारी लोकराजा, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजकारणाचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत करून सामाजिक न्यायाची वाटचाल सुकर केली. 6 मे 1922 रोजी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. येत्या 6 मे, 2022 रोजी या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाच्या कृतज्ञ भावातून हे कृतज्ञता पर्व साजरे करत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दि. 28 एप्रिल, 2022 ते 22 मे, 2022 या दरम्यान हे कृतज्ञता पर्व चालणार आहे. या मध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, प्रश्न मंजुषा, विज्ञान प्रदर्शन, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्या स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र- हस्तकला प्रदर्शन, सिटी बाजार, मर्दानी खेळ, सायकल रॅली, चित्ररथ, कृतज्ञता फेरी यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

या बाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, 5 कोटी रुपयांचा निधी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर यांना उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांसह राजर्षी शाहू महाराज प्रेमींनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: 5 crore fund for organizing Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Gratitude Festival, information of Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.