सार्वजनिक ग्रंथालयांना ४० टक्के अनुदान वाढ; राज्यात २००० नवीन ग्रंथालयांना मान्यता, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:56 IST2026-02-17T12:55:37+5:302026-02-17T12:56:45+5:30
दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना सन्मानित करणार

सार्वजनिक ग्रंथालयांना ४० टक्के अनुदान वाढ; राज्यात २००० नवीन ग्रंथालयांना मान्यता, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा
गारगोटी : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना पुढील आर्थिक वर्षापासून ४० टक्के अनुदान वाढ देण्यात येणार असून, राज्यभरात २००० नवीन ग्रंथालयांना मान्यता दिली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
ते येथे इंजुबाई मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव २०२५ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. माजी आमदार बजरंग देसाई प्रमुख उपस्थित होते.
ग्रंथालयांनी ऑनलाइन माहिती अचूकपणे भरावी. २०११ पासून ग्रंथालयांचा दर्जा पुनर्निर्धारित करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना दर्जावाढ दिली जाणार आहे. जिल्हा ग्रंथालयांसाठी सुसज्ज इमारती उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालयासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ग्रंथालयांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या दहा वर्षांपासून विधिमंडळात सातत्याने आवाज उठविला आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि नवीन पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांगले काम करणाऱ्या ग्रंथालयांसाठी बक्षीस योजना राबविण्याचा विचार असून, अनुदानवाढ आणि वर्गवाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून काम केल्यास वाचन चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कामत यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, शामराव देसाई, राहुल चिक्कोडे, मदन देसाई, सुभाष देसाई, उत्तम कारंडे, सदाशिव शिंदे, युवराज चौगुले, प्रवीण गुरव, जयसिंग नाईक, श्रीधर भोईटे, आनंदा शिंदे, युवराज खापरे, निवृत्ती देसाई, आप्पासो पाटील, रणजित पाटील यांच्यासह तालुक्यातील ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुशांत मगदूम यांनी आभार मानले.
दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना सन्मानित करणार
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून, ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना आकर्षित करण्याची गरज आहे. ई-पुस्तकांच्या माध्यमातून हजारो पुस्तके वाचकांना सहज उपलब्ध करून देता येतात. दुर्मीळ पुस्तकांचाही शोध घेता येतो. राज्यातील १५० वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना विशेष निधी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गारगोटी येथील शाहू वाचनालयाचा त्यात समावेश आहे.