34 Indian tourist Stranded in Indonesia after flights cancelled due to coronavirus kkg | CoronaVirus: पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले 

CoronaVirus: पर्यटनासाठी गेलेले ३४ भारतीय इंडोनेशियात अडकले 

- अनिकेत घमंडी

डोंबिवली: भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले ३४ पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. त्यामध्ये नाहुर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे  हे दाम्पत्य अडकले आहे. १३ ते २० मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. ते सगळे पर्यटक सुखरुप असून त्यापैकी कोणीही आजारी नसले तरी भारतात परत कसे जायचे या चिंतेत ते आहेत. 

नाहुर येथील रहिवासी दिनेश पानसरे यांनी ‘लोकमत’ ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रपणे ते पर्यटनासाठी गेले होते. कोणत्याही सहलींचे आयोजन करणा-या व्यावसायिकांमार्फत ते तेथे गेलेले नाहीत. मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे,  दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत. पण आता त्यांच्याजवळील राखीव ठेवलेला पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. 

पानसरे म्हणाले की, त्यांनी मलेशियन एअरलाईन्सचे तिकिट काढले होते. नियोजनानूसार १३ मार्च रोजी ते तेथे विमानाने गेले, परत येण्यासाठी २० मार्च चे तिकिट होते, परंतू ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे पेच वाढला. तरीही त्यांनी सतर्कता दाखवत लगेच सुमारे ६५ हजार रुपये खर्च करुन एअर इंडियाचे २२ मार्च रोजीची दोन तिकिट काढली, मात्र तेदेखील रद्द झाले. आधीच भारतात परत कसे जायचे आणि विमान तिकिटांसाठी खर्च झालेले पैसे परत मिळतील की नाही? याचीही शाश्वती कोणालाही नाही, त्यामुळे ते अडकल्याच्या भावनेने महिला पर्यटकांना रडू कोसळले.
 
आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस बालीतच रहायचे? असा सवाल पर्यटकांनी केला. तसेच परत जाण्यासाठी पैसेदेखील नसल्याने आता विमानाच्या तिकिटसाठी लागणारी रक्कम कोण देणार ? तो कसा उभारणार ? असे प्रश्न त्यांना पडले असून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहाय्य करावे अशी मागणी त्यांनी केली. पानसरे यांचे सासरे भाऊसाहेब कडवे हे देखिल नाहुर येथे राहतात. त्यांनी पानसरेंना गुरुवारी ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवल्याचे सांगण्यात आले. अडकेल्या सर्व पर्यटकांना सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालावे अशी मागणी कडवे यांनी केली आहे. 

Web Title: 34 Indian tourist Stranded in Indonesia after flights cancelled due to coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.