छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 06:41 IST2025-03-21T06:40:31+5:302025-03-21T06:41:30+5:30

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...

30 Naxalites killed again in Chhattisgarh, one reserve force jawan martyred; Encounter in two districts of Bastar region | छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी

छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी

गडचिरोली : छत्तीसगडमधील बस्तर भागात बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन वेगवेगळ्या चकमकी उडाल्या. यात ३० नक्षलवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.  

बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागातील गंगलूर जंगल परिसरात पाेलिसांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली. यावरून गुरुवारी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात अभियान राबविले. याचवेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाेळीबारात २६ नक्षलवादी ठार झाले. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला.

कांकेर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमाभागात दुसरी चकमक झाली. यात चार नक्षलवाद्यांना सुरक्षा जवानांनी ठार केले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

या वर्षी आतापर्यंत ११३ नक्षलवादी ठार 
बस्तर जिल्ह्यातल्या गुरुवारच्या कारवाईसह, या वर्षी राज्यात आतापर्यंत झालेल्या चकमकीत ११३ नक्षलवादी मारले गेले आहेत. ९७ जणांचा खात्मा बस्तर विभागात करण्यात आला आहे. यात बिजापूर व कांकेरसह सात जिल्ह्यांतील कारवायांचा समावेश आहे. ९ फेब्रुवारीला बिजापूरमधील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार केले होते. यावर्षी आतापर्यंत १८ नक्षलवाद्यांना अटक केली हाेती.

पुढील वर्षीपर्यंत देश नक्षलमुक्त : शाह 
देशाला नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेत सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मोदी सरकारने नक्षलवाद्यांबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत त्यांच्याविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.   

Web Title: 30 Naxalites killed again in Chhattisgarh, one reserve force jawan martyred; Encounter in two districts of Bastar region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.