अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 06:33 IST2025-05-22T06:32:39+5:302025-05-22T06:33:34+5:30

नारायणपूूर - बिजापूरच्या सीमेवर चकमक : ५ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचाही खात्मा, आतापर्यंतचे सर्वात माेठे यश; ५०० हून अधिक जवानांनी राबविले नक्षलविरोधी अभियान, एक जवान शहीद; माेठ्या प्रमाणावर साहित्य व हत्यारे केली जप्त 

27 Naxalites killed in Abuzmad forest; This is how the encounter happened | अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर

अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर


गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेपासून २५ किलोमीटर अंतरावरील छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात बुधवारी सकाळी पाेलिस-नक्षल चकमक उडाली. यात २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पोलिस जवान शहीद झाला. विशेष म्हणजे, या चकमकीत ५ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षल नेता बसवा राजू यालाही पाेलिसांनी कंठस्नान घातले.  

सुरक्षा दलांनी २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले. ही ऐतिहासिक कारवाई असून, मोदी सरकार ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपविण्याचा संकल्प करत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर दिली. कारवाईत सीपीआय-माओवादीचा सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षल चळवळीचा कणा नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजूही मारला गेला. या यशाबद्दल शूर सुरक्षा दलांचे कौतुक करतो. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यावर छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्रात ५४ नक्षलवाद्यांना अटक केली. ८४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, असेही ते म्हणाले.

कसे घडले एनकाउंटर?
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात विविध राज्यांतून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. 

विविध राज्यांत पाच कोटींहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस व ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य बसवा राजू याचादेखील यात समावेश असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. 

या परिसरात २० मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील ५०० हून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. २१ मे रोजी सकाळी पाेलिसांकडून अभियान राबविले जात असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. 
प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांच्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले, एक पोलिस जवान शहीद झाला. घटनास्थळावरून पाेलिसांनी माेठ्या प्रमाणावर साहित्य व हत्यारे जप्त केली. 

२०० नक्षलवादी या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या चकमकींमध्ये ठार झाले. 
१८३ जण बस्तर विभागातील बीजापूर, नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यांत होते.

अबुझमाड : हे छत्तीसगडमधील अतिदुर्गम, घनदाट जंगल आहे. हाच प्रदेश नक्षल चळवळीच्या निर्णयांचा केंद्रबिंदू मानला जातो. 

२०१०  दंतेवाडा हल्ल्यात ७६ सीआरपीएफ जवान शहीद.
२०१३  जिराम घाटी हल्ल्यात काँग्रेस नेते महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेलसह २७ जणांचा मृत्यू झाला.
२०१८ टीडीपी नेता किदारी सर्वेश्वर राव यांची अराकू हत्याकांडात झालेली हत्या.

नाव : नंबाला केशव राव उर्फ गंगन्ना 
उर्फ बसवा राजू उर्फ बीआर दादा
वय : अंदाजे ७० वर्षे
मूळ रहिवासी : श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) 
पद : महासचिव, केंद्रीय लष्करी आयोग प्रमुख, पॉलिट ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य (प्रतिबंधित सीपीआय माओवादी संघटना)

नक्षल चळवळीशी संबंध 
१९७० पासून नक्षलवादी चळवळीशी आहे संबंधित.
१९८० : सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरची स्थापना, प्रमुख संघटक.
१९९२ : केंद्रीय समितीत झाला सामील.
२००४ : सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय लष्करी आयोगाचा प्रमुख. 
२०१८ : संघटनेचा बसवा राजू हा दुसरा सरचिटणीस. १० नाेव्हेंबर २०१८ राेजी मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्या राजीनाम्यानंतर ताे सर्वाेच्च नेता बनला.

ही अत्यंत उल्लेखनीय कामगिरी असून मला सुरक्षा दलांचा अभिमान आहे. आमचे सरकार नक्षलवाद्यांचा धोका नष्ट करण्यास कटिबद्ध आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारताच्या नक्षलविरोधी तीन दशकांच्या लढ्यात सर्वोच्च पातळीवरील नेत्याचा खात्मा ही पहिलीच वेळ आहे. जवानांच्या शौर्याचे कौतुक. 
अमित शाह, गृहमंत्री

अबुझमाडच्या जंगलात बसवा राजू आणि इतर वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती होती. या पार्श्वभूमीवर पथके पाठविली. सकाळी ७-८ वाजेच्या दरम्यान, अनेक वेळा चकमक झाली. त्यानंतर परिसराची झडती घेतली असता,  २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.  
पी. सुंदरराज, पोलिस महानिरीक्षक, बस्तर 
 

Web Title: 27 Naxalites killed in Abuzmad forest; This is how the encounter happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.