"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:53 IST2025-01-11T18:52:53+5:302025-01-11T18:53:41+5:30
ST Bus News: या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल २ हजार ६४० नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असा विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
ठाणे - या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल २ हजार ६४० नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असा विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करताना त्यांनी ही माहिती दिली.
एसटीच्या स्वमालकीच्या नवीन लालपरी बसेस ताफ्यामध्ये दाखल होत असून, आज १७ बसचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. याबाबत अधिक माहिती देताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत १५० लाल परी बसेस येणार असून, त्या ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण भागातील आगारांना देण्यात येतील. त्यानंतर दर महिन्याला ३०० एसटी बसेस दाखल होणार असून, राज्यभरातील सर्व आगारांना या बसेस मिळतील, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
स्वच्छतेबरोबरच सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत राज्यातील एकूणच परिवहन सेवेचा चित्र बदलण्याचा " मास्टर प्लॅन" आपण बनवीत असून, टप्प्याटप्प्याने एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल. त्याचा पहिला लाभ एसटी कर्मचाऱ्यांना झाला पाहिजे. त्यांच्या गणवेशापासून ते विश्रामगृह आणि स्वच्छतागृहापर्यंत त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक सुविधांचा दर्जा उंचावला पाहिजे. तरच आपण प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊ शकतो, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी बोरिवली येथे शंभर खटांचा अद्यावत दवाखाना उभारण्यात येईल. इथे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व सुविधा एसटी कर्मचाऱ्यांना मिळतील अशी यंत्रणा निर्माण करण्यात येणार येईल. अशी घोषणा मंत्री सरनाईक यांनी यावेळी केली.