राज्यात २५ पीएचसी बांधून पूर्ण, २०२ आरोग्य उपकेंद्रे होणार सुरू; साहित्य पुरवण्याचे आदेश
By समीर देशपांडे | Updated: February 13, 2026 12:03 IST2026-02-13T12:02:39+5:302026-02-13T12:03:02+5:30
उपकरणे, यंत्रसामुग्रीसाठी २४ कोटी ९२ लाख रुपये मंजूर

राज्यात २५ पीएचसी बांधून पूर्ण, २०२ आरोग्य उपकेंद्रे होणार सुरू; साहित्य पुरवण्याचे आदेश
समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यात बांधून पूर्ण झालेली २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २०२ उपकेंद्रे आता वापरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक उपकरणे, साधनसामग्री आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी २४ कोटी ९२ लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात गेल्या चार वर्षात आवश्यक ती प्रक्रिया करून ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २१३ उपकेंद्रे बांधण्यात आली होती. बांधकामासाठीचा संपूर्ण निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या आरोग्य केंद्रांच्या इमारती उभ्या राहिल्या. गेल्याच वर्षी काही आरोग्य केंद्रांचे थाटामाटात उदघाटनही झाले. परंतु, यंत्रसामग्री आणि उपकरणे उपलब्ध नसल्याने या ठिकाणी कामकाज सुरू नव्हते. काही ठिकाणी दुसरीकडून साहित्य आणून तात्पुरते कामकाज सुरू करण्यात आले.
परंतु, आवश्यक साधनसामग्री पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसल्याने कामकाजाला मर्यादा येत होत्या. राज्यभरातील आढावा बैठकीवेळी ही बाब समोर आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने याबाबत निविदा प्रक्रिया राबवून १०० टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य केंद्रांना साहित्य पुरवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३१ लाख ६१ हजार ५७८ रुपयांचे साहित्य घेण्यात येणार असून, एका आरोग्य उपकेंद्रासाठी ८ लाख ४२ हजार ६१६ रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी २४ कोटी ९२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही सर्व आरोग्य केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अजूनही २७ पीएचसीसाठी निधी आवश्यक
अजूनही राज्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आणि ११ उपकेंद्रांसाठीच्या साधनसामग्रीसाठी निधी आवश्यक असून तो नव्या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पीएचसी आणि उपकेंद्रांची जिल्हावार संख्या
पीएचसी
नाशिक १, धुळे ४, जळगाव ३, अहिल्यानगर ३, पुणे २, कोल्हापूर ४, सांगली ४, परभणी २, वाशिम २, गडचिरोली १,
आरोग्य उपकेंद्रे
ठाणे १२, पालघर ७, रायगड ६, नाशिक १ धुळे ६, नंदूरबार २५, जळगाव १७, अहिल्यानगर ८, सातारा २३, सोलापूर ४, सांगली १२, रत्नागिरी २ छ. संभाजीनगर २८, परभणी ७, बीड २, धाराशिव २, नांदेड २, अकोला १, अमरावती १०, यवतमाळ १७, बुलढाणा ६, नागपूर २, वर्धा १ चंद्रपूर १.