CoronaVirus लालपरी तीन दिवस सतत धावतेय; २१ हजार ७१४ मजुरांना सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 21:32 IST2020-05-11T21:32:31+5:302020-05-11T21:32:51+5:30
CoronaVirus एका दिवसात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले.

CoronaVirus लालपरी तीन दिवस सतत धावतेय; २१ हजार ७१४ मजुरांना सोडले
मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने गेल्या तीन दिवसांत (९मे-११ मे २०२०) आपल्या विविध आगारातील तब्बल ११६९ बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे २१ हजार ७१४ श्रमिक - मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, ११ मे या एका दिवसात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ५३० एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. अशा प्रकारे गेल्या तीन दिवसांत २१ हजार ७१४ मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात एसटी प्रशासन यशस्वी झाले आहे.
भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना एसटी बसेस मध्ये बसवून, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात, एसटी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत, असे अॅड.परब म्हणाले. या बरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे देखील लॉक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. तरी त्यांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता, एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परब यांनी केले आहे.