खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:47 IST2025-10-24T16:42:37+5:302025-10-24T16:47:15+5:30
काँग्रेसने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असला तरी सर्वात आधी महायुतीतील भाजपाने गायकवाड यांच्याकडील डिफेंडर कारवरून आरोप केले होते.

खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
मुंबई - राज्यात दिवाळीचा उत्साह आहे त्यातच राजकीय आरोपांचे फटाके फुटू लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी २१ आमदारांना जोरदार दिवाळी गिफ्ट मिळाल्याची चर्चा आहे. एकाच ठेकेदाराकडून २१ डिफेंडर कार सत्ताधारी आमदारांना देण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच बुलढाणा येथील शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर कारवरून मित्रपक्ष असलेल्या भाजपानेच आरोप केला होता.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या काळात ५० खोके एकदम ओक्के असा नारा गाजला होता, तसाच आणखी एक नारा येऊ पाहतोय. दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना २१ डिफेंडर कार एका ठेकेदाराने गिफ्ट केल्या आहेत. आता हे २१ आमदार कोण आणि गिफ्ट देणारा तो ठेकेदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही. २१ कार मिळाल्यात त्यातील एक बुलढाण्यातली आहे की ती २२ वी आहे हे पत्रकारांनी शोधावे असं त्यांनी म्हटलं.
काँग्रेसने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असला तरी सर्वात आधी महायुतीतील भाजपाने गायकवाड यांच्याकडील डिफेंडर कारवरून आरोप केले होते. त्यामुळे सध्या संजय गायकवाड यांची डिफेंडर कार चर्चेत आहे. या कारची किंमत जवळपास २ कोटी इतकी आहे. गायकवाड यांच्याकडील या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नाही तर महायुतीतील नेत्याने उकरून काढला आहे. याच वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २१ आमदारांना मिळालेल्या डिफेंडर कारच्या गिफ्टबाबत दावा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाने केला होता आरोप
बुलढाण्यात एक डिफेंडर कार दिसली, त्यावर आमदाराचे स्टीकर लावण्यात आले होते. ती कार एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. कोणत्या कंत्राटातून कमिशन मिळाले याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे असा आरोप भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केला होता. भाजपाच्या या आरोपावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. ती गाडी माझी नसून माझ्या नातेवाईकाची आहे. तो कंत्राटदार असला तरी आधी माझा नातेवाईक आहे. माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे आधी लिजेंडर होती ती विकून डिफेंडर कारवर दीड कोटीचं कर्ज घेतले आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलं. मात्र डिफेंडर कारच्या या वादावरून विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर नवा बॉम्ब टाकला आहे.