महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत निर्णय, दोन हजार पैलवान उद्या कराडमध्ये एकत्र येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:45 IST2026-03-10T18:43:57+5:302026-03-10T18:45:25+5:30
नेमका काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत निर्णय, दोन हजार पैलवान उद्या कराडमध्ये एकत्र येणार
संतोष गुरव
कराड : महाराष्ट्रात कुस्ती खेळात पूर्वी होणारी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत होती. आता वेगवेगळ्या संघटनांकडून चार-चार स्पर्धा होऊ लागल्याने कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत निर्णय भूमिका घेण्यासाठी राज्यातील ४० महाराष्ट्र केसरी पैलवान, हिंदकेसरी पैलवान यांच्यासह २ हजार पैलवान बुधवारी (दि. ११) रोजी कराडला येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर कराड येथील कार्वे नाका येथे ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव स्मारकास सोमवार, (दि. ९) रोजी सायंकाळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, शिवराज जगताप, सरपंच चंदू काशीद यांनी भेट देत पाहणी केली.
यावेळी चंद्रहार पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती बाबत एक निर्णय भूमिका घेणे गरजेचे आहे. कुस्ती क्षेत्रातील दैवत स्वर्गीय ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकाजवळ राज्यातील पैलवान येऊन आपली भूमिका मांडणार आहेत. कुस्ती क्षेत्रातील चुकीच्या गोष्टी व नव्या प्रथा थांबाव्यात.’
नेमका काय निर्णय घेणार?
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत भूमिका मांडण्यासाठी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव स्मारकाजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यातील विविध भागातून जवळपास दोन हजारांहून अधिक पैलवान उपस्थित राहून निर्णय घेणार आहेत. आता ते नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.