पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:21 IST2025-11-22T09:20:53+5:302025-11-22T09:21:51+5:30
Palghar fishermen in Pakistan jail: गुजरातमध्ये मासेमारीसाठी जाताना समुद्रात चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडणारे पालघर जिल्ह्यातील १८ मच्छीमार आजही तुरुंगात आहेत.

Representative Image
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : गुजरातमध्ये मासेमारीसाठी जाताना समुद्रात चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडणारे पालघर जिल्ह्यातील १८ मच्छीमार आजही तुरुंगात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मंजूर केलेल्या मदतीपैकी १६ लाख २० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम देण्याची मागणी जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाने राज्य शासनाकडे केली आहे.
गुजरातमधील बोटींमधून मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडल्याच्या कारणावरून पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने मासेमारी बोटींना ताब्यात घेऊन मच्छीमारांना तुरुंगात ठेवले आहे. सद्य:स्थितीत १९९ भारतीय मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात असून, त्यापैकी १९ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. अटकेत असलेल्या गुजरातच्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना गुजरात सरकार दिवसाला ३०० रुपये इतकी आर्थिक मदत देते. मात्र, गुजरात सरकारने महाराष्ट्रातील मच्छीमार खलाशांना ही मदत देण्यास नकार दिल्याने या प्रकरणी शांतता कमिटीचे सदस्य जतिन देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारने अनुदानाला मंजुरी दिली होती.
प्रत्येकी ८१ लाखांची तरतूद
सरकारने खलाशांच्या अनुदानासाठी १६ लाख २० हजार रुपये मंजूर केले होते. पाकिस्तानी तुरुंगातील मृत विनोद कौल या मच्छीमाराच्या कुटुंबीयांना त्याच्या अधिवास काळातील पूर्ण रक्कम एक कोटी ६१ लाख; तर उर्वरित १८ मच्छीमार खलाशांना प्रतिदिन ३०० रुपयांनुसार २७० दिवसांचे प्रत्येकी ८१ हजार देण्याची राज्य सरकारने तरतूद केली.
४७ लाखांचा निधी प्रलंबित
सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत अद्याप ४७ लाख १६ हजार रुपयांचा सहायता निधी प्रलंबित आहे. त्याकरिता जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मागणी केलेला निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण तातडीने करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली.