गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:41 IST2025-10-01T07:40:45+5:302025-10-01T07:41:32+5:30
पुरामुळे मराठवाड्यात ९१० विद्युत डीपी आणि ९ हजार ७२० विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. यातून महावितरणला तब्बल ३३.८८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा बंद आहे.

गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव (जि. बीड) : पैठणच्या जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पोहोचल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. माजलगाव तालुक्यातील १६ गावांतील पुराचा वेढा यामुळे कमी होईना अशी स्थिती आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले. गोदावरी आणि सिंदफणाकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या, मंजरथ येथे दोन नद्यांचा संगम असल्याने निम्मे गाव पुराच्या पाण्यात आहे. मंगळवारी पाणी पोहोचताच अनेक गावांमध्ये धावाधाव झाली. पूरग्रस्थांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
पुराच्या फटक्याने वीज बंदच छत्रपती संभाजीनगर
पुरामुळे मराठवाड्यात ९१० विद्युत डीपी आणि ९ हजार ७२० विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे. यातून महावितरणला तब्बल ३३.८८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा बंद आहे.
गोदावरीच्या पुराचा तडाखा, १०० हेक्टर मिरची पाण्यात
गडचिरोली : अवकाळी पावसाने पुन्हा उग्र रूप दाखवले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील कोत्तापल्ली, आयपेटा, वडधम, मुत्तापूर माल, अंकिसा, असरअल्ली, सुकारेली, टेकडाताला या गावांतील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची उत्पादकांना बसला. तब्बल १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
'शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस कशी काय दिली?'
मुंबई : राज्यात निम्म्यापेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले असताना अशा वेळी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस कशी काय देण्यात आली? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
उजनीतून विसर्ग कमी, पंढरपुरात पूरस्थिती कायम
पंढरपूर : उजनी धरणातून सोडण्यात आलेला सव्वा लाखाचा विसर्ग कमी करुन ३० हजार करण्यात आला आहे. वीरचा विसर्ग कमी करून २५०० क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे (चंद्रभागा) नदीची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, पंढरपुरात मंगळवारी १ लाख १० हजारांचा विसर्ग वाहत असल्याने पूरपरिस्थिती कायम होती. व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्यामुळे चार कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
सोलापूर : पोहत जाऊन केला ७४ गावांतील वीजपुरवठा सुरळीत, २१ गावांत अजूनही अंधारच, बोटीतूनही प्रवास करीत गावे केली प्रकाशमय.
जळगाव : बोरी नदीवरील बंधारा दौड वर्षातच वाहून गेला वाहून. संपर्क तुटला.
नाशिक : जिल्ह्यात दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने दिलासा. गंगापूरमधून केवळ ९९० क्युसेक विसर्ग.
मदतीचा ओघ
राज्य बँकेकडून १० कोटी
मुंबई : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० कोटी रुपयांची मदत दिली. निधीचा धनादेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
साई संस्थानकडून पाच कोटी
अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटींची मदत जाहीर केली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.
२२ हजार ग्रामपंचायत अधिकारी देणार एक दिवसाचा पगार
बीड : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील २२,००० ग्रामपंचायत अधिकारी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.