१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:01 IST2026-02-19T08:00:34+5:302026-02-19T08:01:34+5:30
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर, तर ९,७८८ दिव्यांगांचा समावेश आहे. राज्यातील २३,६८३ शाळांमधून नोंदणी झाली आहे.

१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार
मुंबई : २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणाऱ्या दहावी परीक्षेला यंदा १६,१५,४८९ विद्यार्थी बसले आहेत. त्याअनुषंगाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी व्यापक तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा मंडळाचे सचिव माळी यांनी दिली. कॉपीसाठी मदत करताना कुणी कर्मचारी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर, तर ९,७८८ दिव्यांगांचा समावेश आहे. राज्यातील २३,६८३ शाळांमधून नोंदणी झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भरारी पथकांची नजर
कॉपीमुक्त अभियानासाठी राज्यात २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा असेल.
वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे जर प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांना २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान परीक्षा देता येणार आहे.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी :
पुणे २,७८,१४५
नागपूर १,५३,८९०
छ. संभाजीनगर १,९१,९५२
मुंबई ३,४९,८७३
कोल्हापूर १,३२,८०८
अमरावती १,६५,३१८
नाशिक २,०६,६३६
लातूर १,११,०८८
कोकण २५,७७९
बारावी परीक्षेत मुंबई विभागात १० कॉपीचे प्रकार
बारावीच्या परीक्षेदरम्यान मुंबई विभागात कॉपी करण्याचे १० प्रकार घडल्याची माहिती मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली. बुधवारी झालेल्या परीक्षांमध्ये रसायनशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये ८, तर राज्यशास्त्र विषयात २, असे एकूण १० गैरप्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
कॉपीमुक्त अभियान काटेकोरपणे राबवले जात असतानाही हे प्रकार घडल्याने चिंता वाढली आहे. राज्यात रसायनशास्त्र पेपरमध्ये ६७, तर राज्यशास्त्र या विषयाच्या पेपरमध्ये ७ गैरप्रकार घडले.