महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 06:16 IST2025-11-10T06:15:52+5:302025-11-10T06:16:48+5:30
Bogus Companies Shut Down: कॉर्पोरेट मंत्रालयाने बोगस कंपन्या बनवून सरकारला चुना लावण्याविरुद्ध मोहीम छेडली आहे. मंत्रालयाने चौथ्या ड्राइव्हमध्ये देशातील ९६,७७९ बोगस कंपन्यांना कुलूप लावले आहे. यात महाराष्ट्रातील १३,०८० कंपन्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
-चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - कॉर्पोरेट मंत्रालयाने बोगस कंपन्या बनवून सरकारला चुना लावण्याविरुद्ध मोहीम छेडली आहे. मंत्रालयाने चौथ्या ड्राइव्हमध्ये देशातील ९६,७७९ बोगस कंपन्यांना कुलूप लावले आहे. यात महाराष्ट्रातील १३,०८० कंपन्यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोगस कंपन्या बनवून जीएसटी चोरी करण्याच्या विरोधात केंद्र सरकारने मोहीम सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा हातात घेतल्यापासून बोगस कंपन्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याला गती मिळाली आहे.
करचोरीसाठी नवीन कंपन्यांची नोंदणी
कंपनीच्या नोंदणीपासून ते व्यवसायाच्या प्रक्रिया सोपी करण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ३९६ नुसार केंद्रीय नोंदणी केंद्राची २०१६ मध्ये स्थापना करण्यात आली होती. मात्र, कर चोरी करण्यासाठी नवीन कंपन्यांची नोंदणी केली जात असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. अशात सरकारने स्वच्छता अभियान सुरु केले आहे.
देशातील ९६,७७९ कंपन्यांना कुलूप
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या चौथ्या स्वच्छता मोहिमेत ९६,७७९ कंपन्यांना कुलूप ठोकण्यात आले. यात पहिल्या क्रमांकावर दिल्ली (१३,३७८) आहे. यानंतर महाराष्ट्र (१३,०८०), उत्तर प्रदेश (११,३९७), कर्नाटक (८००८) आणि पश्चिम बंगालमधील (६९७९) कंपन्यांना कुलूप लावण्यात आले आहे.