नाशिक - मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच इगतपुरीच्या शिबिरातून फुंकले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून महापालिका निवडणुकीचा आढावा घेत दुबार मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर संवाद वाढवण्याचा सल्लादेखील राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मनसेच्या १२० निवडक पदाधिकाऱ्यांना सोबत घेत पक्षाने इगतपुरी येथे राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले होते. यात निवडणूक काळात प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्ष संघटन वाढीसाठी, पक्षाच्या कामासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे पक्षप्रमुखांनी सांगितले.
या शिबिरात उद्धवसेनेसोबत युती व्हावी यासाठी बहुतांश मनसे पदाधिकारी आग्रही असले तरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असं सांगत युतीबाबत परस्पर बाहेर कुणीही बोलू नये असा सज्जड इशारा पदाधिकाऱ्यांना दिला. इगतपुरी येथे मनसेच्या शिबिराचा समारोप राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. या शिबिराला राज्यभरातील निवडक १२० पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रदेश सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनीही विविध प्रश्न राज ठाकरे यांना विचारत आगामी युतीबाबत आग्रह केला. त्यावर ठाकरे यांनी हा निर्णय मीच घेणार आहे परंतु निर्णय घेण्यापूर्वी कुणीही पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी युतीबाबत परस्पर काहीही चर्चा करू नये. याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल असं स्पष्टच सांगितले.
प्रश्नोत्तराचे सत्र चालले तब्बल १०९ मिनिटे
निवडक १२० पदाधिकाऱ्यांसमावेत राज ठाकरे यांनी तब्बल १०९ मिनिटे प्रश्नोत्तराचे सत्र घेतले. मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता सुरू झालेले सत्र दुपारी १२.५४ वाजेपर्यंत चालले. या सत्रात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचेही मत आजमावून घेतले. मध्यंतरीच्या काळात मराठीसाठी मनसेतर्फे विविध आंदोलन करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या व्यथा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून राज यांनी जाणून घेतल्या. एखाद्या कोर्टरूममध्ये जशी प्रश्नोत्तरे होतात तसे प्रश्न पदाधिकारी विचारत होते आणि राज ठाकरे त्यांना उत्तरे देत होते. या प्रश्नोत्तराच्या तासावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे मोबाईल बंद करण्यास सांगितले होते.
"दोन बंधूची युती व्हावी ही राज्याची भावना"
दरम्यान, माजी आमदार बाळा नांदगावकर यांना युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, दोन्ही बंधूची युती व्हावी ही महाराष्ट्राची भावना आहे. आमची भावना ती महाराष्ट्राची भावना आहे. राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्याशी चांगले संबध आहेत. असे असले तरी उद्या संघटन महत्त्वाचे आहे. उद्या पक्षाने एकला चलो रे भूमिका घेतली तरी त्यात वावगे नाही. युतीबाबत जो निर्णय असेल तो निर्णय साहेब घेतील असं नांदगावकर यांनी स्पष्ट केले.