मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:07 IST2017-09-04T19:59:08+5:302017-09-04T20:07:51+5:30
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही.

मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू
अमरावती, दि. 4 - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही. मुळात बालमृत्यू रोखण्यासाठी वरवरची मलमपट्टी नको तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.
आदिवासीबहूल मेळघाट क्षेत्रात सनन १९९६ ते २०१७ या कालावधीत ११ हजार ४३६ बालमृत्यू ( उपजतमृत्यू व बालमृत्यू) झालेत. म्हणजेच वर्षाकाठी सरासरी ५१९ बालमृत्यू होत आहेत. यासोबतच मातामृत्यू देखील होत आहेत. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजरवाणी बाब आहे. मेळघाटातील कोवळ्या पानगळीचे कारण समजून घेण्यासाठी सन १९९३ पासून मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायमूर्ती, आरोग्यमंत्री, सरसंघचालक, सोनिया गांधी यांच्यासह अनेक समिती प्रमुखांचे दौरे झालेत.
मागील २३ वर्षांपासून मुंबई व नागपूरच्या उच्च न्यायालयात जनहित याचिकांवर सुरू झालेला प्रश्नोत्तराचा तास अद्यापही संपलेला नाही. यावर काम करणारे अभियोक्ता अद्यापही मेळघाटात येऊन बालमृत्युची कारणे समजून घेऊ शकलेले नाहीत. कालचे विरोधक आणि आजच्या शासनकर्त्यांनी त्याकाळात मेळघाटातील बालमृत्यूचा प्रश्न सातत्याने पेटता ठेवला. आज मात्र त्यांना या भीषण वास्तवाचा विसर पडला. मेळघाटातील ‘खोज’ संस्थेने हा प्रश्न न्यायालयात सातत्याने लावून धरला आहे. याचिकाकर्ते अॅड. पूर्णिमा उपाध्याय व अॅड. बी.एस. साने मात्र आजही तेवढ्याच जिद्दीने न्यायालयासमोर हा मुद्दा मांडत आहेत आणि हाच एकमात्र आशेचा किरण आहे. राजकीय पक्षांद्वारा मात्र या कुपोषणाचे भांडवल करीत राजकीय पोळी शेकण्यावरच भर दिला जात आहे.
केवळ १५ दिवसांसाठी येतात बालरोगतज्ज्ञ
मेळघाटात दर्जेदार आरोग्यसेवाही नाही. हे देखील बालमृत्यू होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कित्येक वर्षानंतर एक बालरोगतज्ज्ञ आलेत आणि गेलेत. आता पुन्हा एक बालरोगतज्ज्ञ १५ दिवसांसाठी येत आहेत. एवढी गंभीर स्थिती असताना शासकीय यंत्रणाच गंभीर नसल्याने समस्या वाढत आहे. मेळघाटात कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ मिळू नये, ही प्रगत म्हणविणाऱ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे.