पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 23:47 IST2025-08-02T23:46:48+5:302025-08-02T23:47:40+5:30
रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही.

पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव
नागपूर: धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अपवाद वगळता प्रत्येकालाच मोबाईल आपला सखाहरी वाटतो. चार्जिंग संपून तो बंद झाला तरी माणसाला मोठी कमतरता जाणवते. मोबाईल हरवला की माणूस थेट 'पॅनिक मोड'मध्ये जातो. त्याला सगळ जग थांबल्यासारख वाटतं. अशा स्थितीत रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही. खरे वाटो की खोटे, हे वास्तव आहे !
विविध गुन्ह्यांचा छडा लावताना रोख रक्कम, दागिने आणि माैल्यवान चिजवस्तूंसह रेल्वे पोलिसांच्या हाती शेकडो मोबाईल अन् लॅपटॉपही लागले. संबंधितांनी आधीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सोयीनुसार कायदेशिर प्रक्रिया पार पाडून अनेकांनी आपापल्या चिवजस्तू पोलिसांकडून परत नेल्या. मात्र, १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप ‘अनाथ’च राहिले. ज्याचे त्याने परत घेऊन जावे म्हणून रेल्वे पोलिसांनी वेळोवेळी जाहिराती व नोटीस काढून मालकांना हाक दिली. पण कोणीच दाद देईना. एक दशकापेक्षा जास्त कालावधीपासून मोबाईलसह धूळखात पडून असलेले लॅपटॉपही आता निकामी झाले आहेत. त्याचे काय करावे, असा प्रश्न पडल्याने शेवटी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.
'त्या सर्वांचा' लिलाव करा
कोर्टाने पोलिसांच्या मालखान्यात धूळ खात पडलेल्या मोबाईल, लॅपटॉपवर निर्णय देताना 'त्या सर्वांचा' लिलाव करा आणि त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा करा, असे आदेश दिले. त्यामुळे आता या मोबाईल, लॅपटॉपचा लिलाव मंगळवारी ५ ऑगस्टला रेल्वे पोलीस ठाण्यात केला जाणार आहे.
अपवाद पुन्हा एकदा अधोरेखित!
गावखेडे असो की शहर, व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्यांच्याकडे मोबाईल नसेल असा विरळाच. लाडका मोबाईल नेहमीच जवळ असावा, असा जवळजवळ प्रत्येकाचा आग्रह असतो. जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा मिळेपर्यंत तो शांत बसत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीला 'काही लोक अपवाद असतात' हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.