म्हैसकर, रेड्डी, कुंदन, कांबळे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 08:48 IST2025-01-03T08:47:06+5:302025-01-03T08:48:58+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आता याच पदावर वन विभागात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांची याच पदावर कामगार विभागात बदली झाली. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी याच पदावर उच्च व तंत्रशिक्षण विभागात बदलून गेले.

म्हैसकर, रेड्डी, कुंदन, कांबळे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने गुरुवारी १० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. त्यात अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आय. ए. कुंदन आणि वेणुगोपाल रेड्डी यांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आता याच पदावर वन विभागात गेले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय.ए. कुंदन यांची याच पदावर कामगार विभागात बदली झाली. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी याच पदावर उच्च व तंत्रशिक्षण विभागात बदलून गेले.
उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आता सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव असतील. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव असतील. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे आता याच पदावर कृषी विभागात बदलून गेले आहेत. उच्च शिक्षा अभियानाचे संचालक निपुण विनायक हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे नवीन सचिव असतील.
सातारा जिल्हाधिकारी डुड्डी आता पुण्यात
- माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्याकडे आता अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिवपद देण्यात आले आहे.
- साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी आता पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे आता सातारचे नवे जिल्हाधिकारी असतील.
- पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या पदावर पुणे येथे करण्यात आली. हिरालाल सोनावणे हे नवे क्रीडा आयुक्त असतील.
हर्षदीप कांबळे यांची ९ दिवसांत दुसरी बदली
उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची २४ डिसेंबरला बेस्ट; मुंबईच्या महाव्यवस्थपक पदी बदली करण्यात आली होती. मात्र, आज त्यांची बदली सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव या पदावर करण्यात आली, नऊ दिवसात त्यांची दुसरी बदली झाली आहे.