भीमा नदीला १ लाख ४६ हजाराचा विसर्ग; पंढरपुरात पुराचे पाणी शिरणार; बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:25 IST2025-08-20T18:21:02+5:302025-08-20T18:25:22+5:30
उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

भीमा नदीला १ लाख ४६ हजाराचा विसर्ग; पंढरपुरात पुराचे पाणी शिरणार; बंधारे पाण्याखाली
सोलापूर: उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून ९१ हजार ६०० क्यूसेक्स तर वीर धरणातून ५४ हजार ७६० क्यूसेक्स असा एकूण १ लाख ४६ हजार ३६० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
भीमा व नीरा नदीमधून मोठ्या पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. दरम्यान, नदीतील कोल्हापूर पद्धतीचे सर्वच बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. बंधारे पाण्याखाली गेलेल्यावर बॅरेकेट लावून वाहतुकीसाठी बंद करावेत, अशा सूचना तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत. आज २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता संगम येथून १ लाख २० हजार ६९५ क्सूसेक्सने पाणी वाहत आहे तर चंद्रभागा नदी पात्रातून ६० हजार २४७ क्सूसेक्सने पाणी वाहत आहे.
उजनी व वीर धरण घाटमाथ्यावरील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने, नदीपात्रालगत पूरस्थिती निर्माण होवून सखल भागातील नागरी वस्तीमध्ये मध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. तसेच पाणी पातळी वाढत असल्याने पंढरपूर तालुक्यातील 8 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.