लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा, वरासह वऱ्हाडाला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:59 IST2023-06-13T17:59:14+5:302023-06-13T17:59:33+5:30
Marriage News: नवरदेव डोक्यावर मुंडावळ्या बांधून २० वऱ्हाड्यांसोबत उभा होता. तो त्याच्या होणाऱ्या नवरीची वाट पाहत होता. पण वधू आलीच नाही...

लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा, वरासह वऱ्हाडाला बसला धक्का
खरगोन कोर्ट परिसराबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे नवरदेव डोक्यावर मुंडावळ्या बांधून २० वऱ्हाड्यांसोबत उभा होता. तो त्याच्या होणाऱ्या नवरीची वाट पाहत होता. ही वधू खरगोन जिल्ह्यातील सांगवी जलालाबाद येथील रहिवासी आहे. तर वर धार जिल्ह्यातील ढोल गावातील रहिवासी आहे. दरम्यान, तीन तास वाट पाहिल्यानंतरही वधू न आल्याने वर आणि वऱ्हाड्यांच्या संयम सुटला. तर खरगोन कोर्टामध्ये लग्न करणारी वधू ही एक लाख १० हजार रुपये घेऊन फरार झाल्याचे कळताच वर मंडळींना धक्का बसला. त्यानंतर वराने वऱ्हाड्यांना सोबत घेत पोलीस ठाणे गाठले.
वराने संपूर्ण घटनेची कल्पना पोलिसांना दिली. या वराचं ममता नावाच्या वधूशी लग्न राहुल आणि जितेंद्र नावाच्या व्यक्तींनी ठरवलं. मिलगी गरीब आहे, असं सांगत दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर एक लाख १० हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. पैकी १० हजार रुपये गेल्या बुधवारी दिले. तसेच सोमवारी लग्न करण्याचे निश्चित झाले. वर वऱ्हाड घेऊन कोर्टात आला. दरम्यान वधू ममता हिच्या नातेवाईकांनी त्यांना खरगोनमधील टेमला रोड येथे बोलावले. तिथे एक लाख रुपये देण्यात आले. तसेच सराफा बाजारातून अंगठी, तसेच इतर वस्तू खरेदी करून दोन्ही पक्ष कोर्टाच्या दिशेने निघाले. मात्र तीन तास वाट पाहूनही वधू आणि तिचे नातेवाईक कोर्टात पोहोचले नाहीत. तसेच त्यांचे मोबाईलही बंद होते.
तीन तास वाट पाहिल्यानंतर वर आणि वऱ्हाडी मंडळींनी खरगोन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तिथे जाऊन संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली. दरम्यान, एक लाख रुपये हे टेमला रोड येथे देण्यात आल्याने या प्रकरणी मेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वर रामेश्वर याने सांगितले की, लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून एक लाख दहा हजार रुपये हडपण्यात आले. घर गहाण ठेवून लग्नासाठी पैसे दिले होते. मात्र वधू हे पैसे घेऊन फरार झाली. पैसै मिळावेत म्हणून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून कलम ४२० अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. आता या प्रकरणी संबंधिक वधू आणि पैसे घेणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.