मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:00 IST2025-10-13T16:58:40+5:302025-10-13T17:00:28+5:30
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील पन्ना येथे खेर माता मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एका मजुराचे आयुष्य एका क्षणात बदलले.

मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
मध्य प्रदेशातील पन्ना येथे खेर माता मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एका मजुराचे आयुष्य एका क्षणात बदलले. रस्त्याच्या कडेला चमकणारा एक दगड उचलल्यानंतर तो सामान्य दगड नसून ४.०४ कॅरेटचा रत्न-गुणवत्तेचा हिरा असल्याचे उघड झाले आहे. पन्ना जिल्हा त्याच्या हिऱ्यांच्या खाणींसाठी ओळखला जातो, पण रस्त्याच्या कडेला सापडलेल्या या चमकदार वस्तूने एका सामान्य कामगाराचे आयुष्य बदलून टाकले आहे.
पन्ना जिल्ह्यातील आदिवासी राहुनिया गुर्जर समुदायाचे ५९ वर्षीय रहिवासी गोविंद सिंग हे सकाळी नेहमीप्रमाणे खेर माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मंदिराचे दर्शन घेऊन घरी परतत असताना, गोविंद सिंग यांना रस्त्याच्या कडेला काहीतरी चमकताना दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी तो दगड उचलला आणि घरी आणला. कुटुंबाला तो दाखवल्यानंतर त्यांनी त्याची खात्री करण्यासाठी हिऱ्याच्या कार्यालयात जाऊन चाचणी केली. तपासणीमध्ये हा दगड ४.०४ कॅरेटचा रत्न-गुणवत्तेचा हिरा असल्याचे सिद्ध झाले.
गोविंद सिंग म्हणाले, "मी नेहमीप्रमाणे मातेला भेटायला गेलो होतो. परत येताना मला रस्त्याच्या कडेला एक चमकणारा दगड दिसला. उत्सुकतेपोटी मी तो घरी आणला. माझ्या कुटुंबाला तो दाखवल्यानंतर आम्हाला कळले की, तो हिरा आहे."
हिऱ्यांचे तज्ञ अनुपम सिंग यांनी स्पष्ट केले की हा हिरा रत्न-गुणवत्तेचा असल्याने त्याला बाजारात जास्त मागणी आहे. येत्या लिलावात हा हिरा खुल्या बोलीसाठी ठेवला जाईल. लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्यांकडून ११.५ टक्के रॉयल्टी वजा केली जाईल. उर्वरित रक्कम थेट मजुराच्या खात्यात जमा केली जाईल.
मजुरी आणि भाजीपाला शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गोविंद सिंग यांच्यासाठी हे अनपेक्षित भाग्य एका उत्तम संधीत रूपांतरित झाले. गोविंद यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून ते शेती सुलभ करण्यासाठी ट्रॅक्टरसाठी मातेला प्रार्थना करत होते. आता या हिऱ्यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर ते सर्वप्रथम अपूर्ण घर पुन्हा बांधण्यासाठी करतील आणि जर पैसे शिल्लक राहिले, तर ट्रॅक्टरही खरेदी करतील, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.