‘बजरंग दलात अनेक चांगली माणसं, बंदी घालणार नाही’, दिग्विजय सिंह यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:38 IST2023-08-16T16:38:16+5:302023-08-16T16:38:29+5:30
या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू आणि हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरत आहे.

‘बजरंग दलात अनेक चांगली माणसं, बंदी घालणार नाही’, दिग्विजय सिंह यांचे मोठे वक्तव्य
Madhya Pradesh Election: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर बजरंग दलावर बंदी घालणार नाही, असे दिग्विजय सिंह यांचे म्हणणे आहे.
बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या हिंदू राष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्याचाही बचाव केला आहे. दिग्विजय म्हणाले की, बजरंग दलातही अनेक चांगले लोक आहेत, मात्र गुंडांना सोडले जाणार नाही. हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी तयार केला. सॉफ्ट किंवा हार्ड हिंदुत्व नसते, याचा सनातन धर्माशी काहीही संबंध नाही. संविधानाची शपथ घेतल्यानंतर हिंदुत्वाची चर्चा करणाऱ्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असेही त्यांनी म्हटले.
कमलनाथ यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?
दिग्विजय यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या वक्तव्याचा बचाव करत त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे म्हटले. देशात 80 टक्के हिंदू आहेत, त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे, असे कमलनाथ म्हणाले होते. त्यावर दिग्विजय सिंह म्हणाले की, हिंदूंची संख्या मोजणे चुकीचे आहे का. काही लोक माझ्या आणि कमलनाथ यांच्यात वाद निर्माण करू इच्छित आहेत, परंतु आम्ही चार दशकांपासून एकत्र काम करत आहोत.