Crime: "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:36 IST2025-11-08T12:34:02+5:302025-11-08T12:36:16+5:30
Man Kills Mother Over Black Magic: जादूटोण्याचा संशयातून २५ वर्षीय तरुणाने जन्मदात्या आईची हत्या केली.

AI Image
अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयाने मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. शहडोल जिल्ह्यातील झिकबिजुरी चौकी परिसरातील कुटेला गावात एका तरुणाने जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची कुऱ्हाड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या केली. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने मृतदेह शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सत्येंद्र सिंग (वय, २५) याला त्याची आई प्रेमबाई सिंग यांच्यावर काकांचा मृत्यू आणि कुटुंबातील आजारपणासाठी जादूटोणा करत असल्याचा संशय होता. याच अंधश्रद्धेपोटी, सत्येंद्रने त्याचा काकाचा मुलगा ओमप्रकाश याच्यासह मिळून प्रेमबाई यांना कुऱ्हाडीने व काठ्यांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मृतदेह लपवण्याचा कट रचला. सत्येंद्रने त्याचा पुतण्या गुलाब सिंग, अमन सिंग आणि अमोद सिंग यांच्या मदतीने मृतदेह शेतात पुरून टाकला.
हे क्रूर कृत्य जास्त काळ लपून राहू शकले नाही. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी शेतात उत्खनन करून प्रेमबाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला, ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणी पोलिसांनी सत्येंद्र सिंगसह एकूण पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.