मध्य प्रदेश परिवहन विभागाचा माजी शिपाई सौरभ शर्माच्या भोपाळ येथील घरावर लोकायुक्तांच्या सुरू असलेल्या छाप्यात सातत्याने मोठे खुलासे होताना दिसत आहेत. माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरातून आणि कार्यालयातून आतापर्यंत 2 कोटी 85 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. याशिवाय, 50 लाख रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिनेही आढळून आले आहेत.
लोकायुक्त डीएसपी रविंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी शिपाई सौरभ शर्माच्या घरातून 60 किलो वजनाच्या चांदीच्या सळ्या, 4 एसयूव्ही, याशिवाय कोट्यवधींच्या संपत्तीचे दस्तऐवजही मिळाले आहेत. यासंदर्भात आणखीही चौकशी सुरू आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकायुक्तांना सौरभच्या घरात नोटा मोजण्याचे मशीनही मिळाले आहे. सौरभ एखाद्या हवाला नेटवर्कचा भाग असू शकतो, असा संशयही व्यक्त केला जात आहे. यामुळे त्याचे इतर शरहे आणि देशांत काही लिंक आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.
लोकायुक्तांनी आरटीओतील माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्माच्या अरेरा कॉलनीतील घरावर आणि ऑफीसमध्येही गुरुवारी छापा टाकला. ही कारवाई अद्यापही सुरूच आहे. या कारवाईदरम्यान लोकायुक्तांच्या टीमला सौरभ घरी सापडला नाही.
तत्पूर्वी, सौरभ शर्माने आरटीओ कांस्टेबल असताना उत्पन्नाच्या तुलनेत खूप अधिक कमाई करून कोट्यधींची संपत्ती जमवली आहे. सौरभने जवळपास दीड वर्षांपूर्वीच आरटीओ कॉन्स्टेबलपदावरून व्हीआरएस घेतला होता आणि त्यानंतर बिल्डर बनला होता.
लोकयुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ शर्माला वडिलांच्या मृत्यूनंतर 2015 अनुकंपा तत्वावर आरटीओमध्ये नोकरी मिळाली होती. यानंतर कंस्ट्रक्शन क्षेत्रात उतरला होता.