मध्य प्रदेशमधील चित्र बदलले, शिवराज सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार? आली अशी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 21:11 IST2023-11-03T21:11:40+5:302023-11-03T21:11:40+5:30
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाजी मारणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार याबाबत उत्सुकता आहे.

मध्य प्रदेशमधील चित्र बदलले, शिवराज सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार? आली अशी आकडेवारी
सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे ते मध्य प्रदेशवर. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा बाजी मारणार की काँग्रेस परिवर्तन घडवणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीचा शेवटचा सर्व्हे आज समोर आला आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या या सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात असलेली सत्ताविरोधी लाट, पक्षांतर्गत गटबाजी आणि काँग्रेसने केलेली जोरदार तयारी यामुळे मध्य प्रदेशातील यावर्षीची निवडणूक भाजपाला जड जाणार असं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या सर्व्हेनुसार २३० जागा असलेल्या मध्य़ प्रदेशमध्ये भाजपाला ११९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १०७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. इतरांच्या खात्यामध्ये ४ जागा जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हेमध्ये मतदारांनी शिवराज सिंह चौहान यांनाच प्रथम पसंती दर्शवली आहे. या सर्व्हेनुसार ४३ टक्के मतदारांनी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यंमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. तर ४० टक्के मतदारांनी कमलनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्याशिवाय ११ टक्के मतदारांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि १ टक्का मतदारांनी दिग्विजय सिंह यांच्या नावाला पसंती दिली आहे.