MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:05 IST2025-09-30T14:03:55+5:302025-09-30T14:05:07+5:30
Madhya Pradesh Panna Accident News: मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी अष्टमीच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला.

MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी अष्टमीच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. पद्मावती मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींसह तिघांचा भरधाव पर्यटक बसने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
जिल्ह्यातील अजयगड बायपासवर ही थरारक घटना घडली. मोटारसायकलवर असलेले मृत हे चीमा येथील रहिवासी होते. मृतांची नावे लालकरण (वय, २२), अंजली (वय, १७) आणि अनारकली (वय, १२) अशी आहेत. मोटारसायकल लालकरण चालवत होता, जो मुलींचा चुलत भाऊ होता. तिघेही अष्टमीनिमित्त मंदिरात पूजा करून घरी परतत असताना, समोरून येणाऱ्या पर्यटक बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने पन्ना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; मृतदेह पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
बस चालकाचा शोध सुरू
पन्ना कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी रोहित मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर तिघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली बस आणि दुचाकी जप्त केली. मात्र, अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.