तेव्हा ज्योतिरादित्य शिंदेंऐवजी काँग्रेसने कमलनाथना निवडले; तेही गेले हेही... राज्यसभेवरून बिनसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 20:17 IST2024-02-17T20:16:34+5:302024-02-17T20:17:26+5:30
कमलनाथ त्यांचा मुलगा नकुलसोबत अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे जवळपास डझनभर आमदार व माजी आमदार आहेत. हे सर्व भाजपात जाण्याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु झाली आहे.

तेव्हा ज्योतिरादित्य शिंदेंऐवजी काँग्रेसने कमलनाथना निवडले; तेही गेले हेही... राज्यसभेवरून बिनसले
काँग्रेसला एका मागोमाग एक धक्के बसू लागले आहेत. इंडिया आघाडीतील पक्ष साथ सोडून एकटे लढण्याच्या घोषणा करत असताना पक्षातीलच बडे नेते एकेक करून सोडून जाऊ लागले आहेत. यात आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचेही नाव जोडले गेले आहे.
कमलनाथ त्यांचा मुलगा नकुलसोबत अचानक दिल्लीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे जवळपास डझनभर आमदार व माजी आमदार आहेत. हे सर्व भाजपात जाण्याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाकडून कमलनाथ यांच्याशी कोणताही संपर्क साधला गेलेला नाहीय. म्हणजेच कमलनाथ यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाहीय.
कमलनाथ यांच्या दिल्ली निवासस्थानी सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. परंतु इंदिरा गांधी यांनी ज्या कमलनाथना तिसरा मुलगा मानलेले ते कसे काय काँग्रेस सोडून जाऊ शकतात, असा प्रश्न राजकीय धुरिणांना पडला आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेसाठी कमलनाथ यांचे नाव सुचवले गेले नाही, यामुळे ते नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.
कमलनाथ त्यांचा मुलगा नकुलच्या राजकीय भविष्याच्या शोधात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असेही कारण दिले जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नकुलला जिंकण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली होती. शा परिस्थितीत आपल्या मुलाला भाजपात मोठी जबाबदारी मिळवून देऊन ते मुलाचे करिअर सेट करू इच्छित आहेत.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदेंच्या आणि कमलनाथ यांच्यातील स्पर्धेत कमलनाथ यांना निवडले होते. यामुळे शिंदे भाजपात गेले होते. राहुल गांधींचे एकदम खास असलेले शिंदे गेले ते गेले आता कमलनाथही भाजपात जात असल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. काँग्रेसने कमलनाथ यांना अनेकवेळा संधी दिली होती.