दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:01 IST2025-11-20T08:44:10+5:302025-11-20T09:01:18+5:30

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील 'कोल्ड वॉर'मुळेच एकनाथ शिंदेंना दिल्ली गाठावी लागली असा दावा सुषमा अंधारेंनी केला.

Shinde Group Leaders May Join BJP Soon Using BJP Internal Fight for Merger Plan says Sushma Andhare | दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा

दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा

Sushma Andhare on Amith Shah-Eknath Shinde Meet: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. मित्रपक्षांमध्येच सुरू असलेल्या नेत्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे व्यक्त केली. मंगळवारी झालेल्या या नाराजीनाट्यानंतर बुधवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याच जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत शिंदेंनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार केली.  महायुतीतील अंतर्गत वादावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वामध्येच अंतर्गत संघर्ष असल्याचे म्हटले आहे.

'कल्याण-डोंबिवली'तून नाराजीचा सूर

एकनाथ शिंदे यांनी प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील राजकारणावरून अमित शाहांकडे तक्रार केली. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण-डोंबिवली क्षेत्रात रवींद्र चव्हाण यांच्याकडून जाणीवपूर्वक शिंदेसेनेचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून फोडले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
"आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते आणि त्यातून वातावरण दूषित करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न आहे. काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे पोषक वातावरण बिघडवत आहेत, ज्यामुळे विरोधकांना अनावश्यक फायदा मिळतोय. युतीतील नेत्यांनी एकमेकांवरील टीका टाळायला हवी," असं एकनाथ शिंदे म्हणाल्याची चर्चा आहे.

शिंदे यांनी युतीतील नेत्यांकडून संयम राखण्याची आणि सार्वजनिक विधाने करताना सुसंवाद ठेवण्याची अपेक्षा अमित शाहांसमोर व्यक्त केली. यापूर्वीही राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही बाब कळवल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीवर सुषमा अंधारे यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्यानेच शिंदे थेट शाह यांच्याकडे गेले, असे म्हटले, तसेच, उदय सामंत यांना उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे, त्यामुळे ते भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही अंधारे यांनी केला आहे.

"एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून ज्यांमुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला ज्यांनी खतपाणी खाले असे अमित शाह एकमेव भाजपमधील तारणहार म्हणून सध्या एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहेत. त्यांना कुणाकडे दाद मागायची असेल तर ती एकमेक व्यक्ती अमित शाह आहेत. त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे दरे गाव गाठतात नाहीतर अमित शाह यांच्याकडे जायला निघतात. मुळात अमित शाह यांच्याकडेच ते का जातात त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारे कोल्ड वॉर आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे जो अमित शाह यांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो आणि जो फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शाह यांना फार प्रिय असतो," असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

"त्याच न्यायाने जर रवींद्र चव्हाण यांनी आमची माणसं फोडली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेले असतील. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदय सामंत त्याच वेळी रवींद्र चव्हाण यांना भेटायला जातात. जर कदाचित उद्या अशी काही परिस्थिती आली की आपल्याला चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडायची असेल आणि भाजपमध्ये विलिन व्हायचं असेल तर काय करावं. उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा गट घेऊन भाजपमध्ये जाऊ शकतात. कारण तसेही संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट ही सगळी माणसं त्रस्त झालेली आहेत. या सगळ्यांचा शिंदेंपेक्षा उदय सामंत यांच्याकडे कल जास्त आहे. त्यामुळे २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी नाटकाचा जो अंक दाखवला होता त्यानंतर आता त्याचा दुसरा अंक आता सुरु आहे," असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Web Title: Shinde Group Leaders May Join BJP Soon Using BJP Internal Fight for Merger Plan says Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.