वायू प्रदूषणामुळे घटले आयुष्य; आशिया-आफ्रिकेला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:08 IST2018-09-18T11:49:53+5:302018-09-18T12:08:01+5:30
२०१६ साली गोळा केलेल्या जगभरातील माहितीचा उपयोग ग्लोबल बर्डन आॅफ डिसिज या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर आणि लोकांचे आयुष्यमान यांचा सहसंबंध तपासणारा प्रत्येक देशामध्ये असा पहिल्यांदाच अभ्यास करण्यात आला.

वायू प्रदूषणामुळे घटले आयुष्य; आशिया-आफ्रिकेला धोका
टेक्सस-हवा फुकट असली तरी दुषित हवेमुळे माणसाला मोठी किंमत चुकवावी लागते. जगभरामध्ये वायू प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे आरोग्यावर होणारा परिणाम. त्यामुळे जगातील सर्व लोकांचे आयुष्य सरासरी एका वर्षाने घटल्याचे धक्कादायक वास्तव शास्त्रज्ञांना आपल्या निरीक्षणातून दिसले आहे. आशिया आणि आफ्रिकेतील लोकांचे आयुष्य इतर देशांतील नागरिकांपेक्षा अधिक धोक्यात असल्याच निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
२०१६ साली गोळा केलेल्या जगभरातील माहितीचा उपयोग ग्लोबल बर्डन आॅफ डिसिज या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर आणि लोकांचे आयुष्यमान यांचा सहसंबंध तपासणारा प्रत्येक देशामध्ये असा पहिल्यांदाच अभ्यास करण्यात आला. (पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेत तरंगणारी सुक्ष्म प्रदूषके).
वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्याशी थेट संबंध असतो. फुप्फुसं आणि हृद्याचे अनेक विकार यामुळे होतात. वायूप्रदुषणामुळे आजार होतात आणि मृत्यूही संभवत असला तरी त्याचा आयुष्यमानावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास टेक्सस विद्यापीठातील जोशुआ अप्टे हे पर्यावरण तज्ज्ञ व त्यांचा चमू करत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पीएम २.५ ते १० मायक्रोग्रॅमपर्यंत असणेच योग्य असल्याचे सुचविले आहे. जगातील कॅनडासारख्या काही श्रीमंत देशांनी हवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र गरिब देशांमध्ये प्रदूषण भरपूर असल्याचे त्यांच्या अभ्यासात आढळले. भारतामध्ये हवेचे प्रदूषण सर्वात जास्त झाल्याचेही या निरीक्षणामध्ये दिसून आले आहे.