ग्लुकोमीटरच्या वापरामुळे हिमोग्लोबिन घटते?; डायबिटीसमध्ये आहारात काय घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:31 IST2025-02-06T13:30:33+5:302025-02-06T13:31:38+5:30
पुरेशा लाल रक्तपेशी तयार झाल्या नाहीत वा त्या वेगाने नष्ट होत असल्यास हिमोग्लोबिन पातळी कमी होऊन अशक्तपणा येतो.

ग्लुकोमीटरच्या वापरामुळे हिमोग्लोबिन घटते?; डायबिटीसमध्ये आहारात काय घ्याल?
मुंबई : मधुमेहासारख्या आजारात रुग्णाच्या शरीरातील ग्लुकोज तपासणी करण्यासाठी रक्त चाचण्या कराव्या लागतात. त्यात अनेक जण इन्स्टंट रक्तचाचणीसाठी ग्लुकोमीटरचा वापर करतात. मात्र, अशा सतत काढल्या जाणाऱ्या रक्तामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी घसरत असल्याचा गैरसमज आहे. मुळात तसे काही होत नाही, असे मधुमेह तज्ज्ञ डॉ. दीपक चतुर्वेदी यांनी सांगितले.
पुरेशा लाल रक्तपेशी तयार झाल्या नाहीत वा त्या वेगाने नष्ट होत असल्यास हिमोग्लोबिन पातळी कमी होऊन अशक्तपणा येतो.
लक्षणे काय?
अंगदुखी, छातीत दुखणे, अशक्तपणा, हृदयाचे जलद ठोके आणि श्वास लागणे, अशी लक्षणे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे दिसू शकतात.
आहारात काय घ्याल?
आहारात फॉलिक अॅसिडचे प्रमाण वाढवा. फोलेट हे शरीराला आवश्यक महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. यामुळे शरीरात हेम (लोहा) ची • निर्मिती होण्यास मदत होते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल, तर हा उपाय नक्की करा.
पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, 3 राजमा, अॅवोकॅडो आणि लँट्यूस, असे पदार्थ आहारात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता.
ही आहेत प्रमुख कारणे
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव, लोह, व्हिटॅमिन बी-१२, फोलेट यांची कमतरता, किडनी रोग, यकृत रोग किंवा हायपो थायरॉइडीझमवर परिणाम करणारे कर्करोग आदीमुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, असे तज्ज्ञ सांगतात.
महत्त्वाचे कार्य काय?
हिमोग्लोबिन हे फुफ्फुसातून शरीराच्या ऊती आणि अवयवांमध्ये ऑक्सिजन वाहून नेते. तसेच कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसात परत नेतो.
ग्लुको मीटरद्वारे रक्तातील ग्लुकोज तपासण्यासाठी एक थेंब रक्त घेतले जाते, ते माइक्रो मिलीलीटर असते. त्याचा शरीरातील हिमोग्लोबिनवर कोणताही फरक पडत नाही. -डॉ. दीपक चतुर्वेदी, तज्ज्ञ