पूर्ववैमनस्यातून चाकू अन् काठीने हल्ला करत तरुणाचा खून; अहमदपुरात सहा जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:11 IST2025-12-23T12:08:49+5:302025-12-23T12:11:14+5:30
यातील दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून, चाैघे फरार आहेत.

पूर्ववैमनस्यातून चाकू अन् काठीने हल्ला करत तरुणाचा खून; अहमदपुरात सहा जणांवर गुन्हा
- गणिबी शेख
अहमदपूर (जि. लातूर) : पूर्ववैमनस्यातून एका २६ वर्षीय तरुणाचा चाकू आणि काठीने मारहाण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना अहमदपुरात घडली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून, चाैघे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी उमेर खाजा मैनोद्दीन बागवान आणि मयत शोएब इसाक बागवान (वय २६, रा. बागवान गल्ली, अहमदपूर) हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास किराणा दुकानालगत उभे हाेते. दरम्यान, मागील वादातून सहा आरोपींनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. चाकू आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये शोएब बागवान हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमीर खलील शेख, कलीम खलील शेख, गणीबी शेख आणि मालन बबलू शेख (सर्व रा. अहमदपूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या दाेन आरोपींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, इतर चार आरोपी फरार झाले आहेत. अहमदपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अहमदपूर पोलिस ठाण्याला भेट देत तपासाचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार, पोलिस उपनिरीक्षक रवी बुरकुले, आनंद श्रीमंगले, स्मिता जाधव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष केदासे हे करीत आहेत.