ऊसाच्या ट्रकखाली चिरडून ऊसतोड कामगाराच्या मुलाचाच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 17:31 IST2020-01-10T17:29:47+5:302020-01-10T17:31:24+5:30
याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ऊसाच्या ट्रकखाली चिरडून ऊसतोड कामगाराच्या मुलाचाच मृत्यू
किल्लारी (जि़ लातूर) : औसा तालुक्यातील गाढवेवाडी शिवारातील एका शेतकऱ्याचा ऊस घेऊ जाणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला़ ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
श्रीधर रमेश राठोड (१६, रा़ बोणती बोजातांडा, ता़ बाºहाळी औराद) असे मयत मुलाचे नाव आहे़ पोलिसांनी सांगितले की, गाढवेवाडी (ता़ औसा) शिवारातील एका शेतकऱ्याचा ऊस साखर कारखान्यास जात आहे़ गाढवेवाडी तांडा ते तपसे चिंचोली रस्त्यावरील रावसाहेब बिराजदार यांच्या शेताजवळ विजेच्या तारांचा ऊसाच्या ट्रकला स्पर्श होऊ नये म्हणून गुरुवारी सायंकाळी ट्रक (आरजे ०५, जीए ३४८०) मागे घेण्यात येत होता़ दरम्यान, ऊस तोडीच्या टोळीतील मुलगा श्रीधर रमेश राठोड (१६, रा़ बोणती बोजातांडा, ता़ बाºहाळी औराद) कटिंग करण्यासाठी लामजना येथे निघाला होता़ अचानकपणे तो ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ याप्रकरणी रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलीस ठाण्यात ट्रक चालक गणपत गंगाराम चव्हाण (रा़ विळेगाव तांडा, ता. देवणी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि़ म्हेत्रेवार करीत आहेत़