शिक्षकांचाच पगार उशिरा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:15+5:302021-05-14T04:19:15+5:30
लातूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच बाबींचे नियोजन कोलमडले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणारे शिक्षक ...

शिक्षकांचाच पगार उशिरा का?
लातूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच बाबींचे नियोजन कोलमडले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणारे शिक्षक तसेच कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करीत सेवा बजावणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड आहे. परिणामी, शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, वेळेवर वेतन देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेचे एकूण १२७८ शाळा आहेत. जवळपास ५ हजार ५०० शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. अनेक शिक्षक कोरोनाच्या या संकट काळात प्रशासनाला सहकार्य करीत आहेत, तर अनेकजण शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेत आहेत. मात्र, वेतन वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. दर महिन्याच्या १ ते ५ तारखेला वेतन अपेक्षित असताना दीड दीड महिना वेतन थकीत राहत असल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, कोरोनाच्या या परिस्थितीत वैद्यकीय उपचार करण्यासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे उसनवारीवर दिवस काढावे लागत आहेत. शिक्षकांचे वेतन वेळेवर केल्यास गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, शिक्षकांचे वेतन वेळेवर करावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
दोन महिन्यांचे वेतन रखडले
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांची गैरसोय होत आहे. मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते, वैद्यकीय उपचार कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांना काम करूनही वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा शिक्षकांचे वेतन करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. याबाबत राज्य शासनाकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच तत्काळ वेतन अदा केले जाईल.
- विशाल दशवंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. लातूर
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पगार थकला आहे. घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, शैक्षणिक शुल्क, वैद्यकीय उपचारासाठी पैशाची गरज आहे. वेतन वेळेवर नसल्याने आर्थिक परवड होत आहे. नियमित वेतन केल्यास गैरसोय दूर होईल. - प्रकाश देशमुख
कोरोनाच्या काळात अनेक शिक्षक प्रशासनाच्या आदेशानुसार सर्वेक्षण, लसीकरण मोहिमेत सहभागी आहेत, तर अनेकजण शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर देत आहेत. मात्र, वेतन मिळत नसल्याने गैरसोय होत आहे.
- मंगेश सुवर्णकार
गेल्या दोन महिन्यांपासून घराचे हप्ते थकले आहेत. त्यावर बँका व्याज आकारणी करीत आहेत. जि. प.ने वेळेवर वेतन केल्यास शिक्षकांनाही कामात प्रोत्साहन मिळेल. कोरोनाच्या काळात अनेकजण प्रशासनाला मदत करीत आहेत. त्यामुळे थकीत वेतन तत्काळ द्यावे. तसेच वेळेवर नियमित वेतन करावे. - संगमेश्वर शिवणे