तुम्ही, माझे काेणतेच काम का करत नाही? म्हणत ग्रामसेवकाला मारहाण करुन खाेलीत डांबलं, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 22:24 IST2025-07-04T22:23:46+5:302025-07-04T22:24:09+5:30
याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात उपसरपंच नितीन शिवाजी जाधव याच्याविराेधात मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तुम्ही, माझे काेणतेच काम का करत नाही? म्हणत ग्रामसेवकाला मारहाण करुन खाेलीत डांबलं, गुन्हा दाखल
लातूर : तुम्ही माझे काेणतेच काम करीत नाहीत? म्हणून उपसरपंचाने ग्रामसेवकाला शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय, कामकाज करत असलेल्या खाेलीचा दरवाजा बाहेरुन बंद करुन डांबून ठेवल्याची घटना शिरसी (ता.जि. लातूर) येथे शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात उपसरपंचाविराेधात गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. लातूर न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी साेमनाथ विठ्ठल निरुडे (वय ५४, रा. भातांगळी ता. लातूर, ह.मु. रविंद्रनाथ टागाेर नगर, लातूर) हे एप्रिल २०२५ पासून शिरसी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ते शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात जावून कामकाज करीत हाेते. सकाळी १० वाजता उपसरपंच नितीन शिवाजी जाधव हे कार्यालयात आले. त्यांनी तुम्ही माझे काेणतेच काम करीत नाहीत, म्हणून थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मारहाण करण्यासाठी अंगावर धाव घेतली. त्यावेळी फिर्यादीने आपण असे गैरवर्तन करुन नये, आपली अडचण काय आहे? मला सांगा. मी ती साेडविताे म्हणाले असता, त्यांनी शिवीकाळ करत मारहाण केली. गावात परत दिसल्यास तुझा पाय माेडून टाकताे, तू ग्रामपंचायत कार्यालयात आलास तर असेच काेंडून ठेवताे, अशी धमकी दिली. खाेलीचा बाहेरुन दरवाजा बंद करुन काेंडून ठेवले. त्यावेळी मी खिडकीतून आवाज दिल्यानंतर गावातील मकरंद शेळके, रामराजे जाधव, तुकाराम शिंदे हे आले. त्यांनी मला खाेलीचा दरवाजा उघडून बाहेर काढले.
याबाबत लातूर ग्रामीण ठाण्यात उपसरपंच नितीन शिवाजी जाधव याच्याविराेधात मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१४ दिवसांची न्यायालयीन काेठडी...
लातूर गटविकास अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. ग्रामपंचायत कार्यालयाला मी तातडीने भेट दिली. यावेळी उपसरपंचाला ताब्यात घेत पाेलिस ठाण्यात आणले. याबाबत गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक केली. न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. - अरविंद पवार, पाेलिस निरीक्षक, ग्रामीण पाेलिस ठाणे, लातूर
रक्तदाब व मधुमेह असल्याचे सांगितले...
फिर्यादीने आपल्याला रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याची जाणिव करुन दिली. तरीही उपसरपंच जाधव याने शिवीगाळ करुन मारहाण केली. खाेलीचा दरवाजा बंद करुन डांबून ठेवत जायबंदी करण्याची व नाेकरी घालण्याची धमकी दिली, असेही ग्रामसेवकाने जबाबात म्हटले आहे.