नातेवाईकांना सोडून परताना कारची ट्रकला पाठीमागून भीषण धडक; दोघे युवक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:40 IST2025-12-05T15:38:22+5:302025-12-05T15:40:01+5:30
अहमदपूर बायपासवरील घटना : कारचा चक्काचूर

नातेवाईकांना सोडून परताना कारची ट्रकला पाठीमागून भीषण धडक; दोघे युवक जागीच ठार
अहमदपूर (जि. लातूर) : नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडून गावाकडे परतणाऱ्या दोघा युवकांच्या कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरील अहमदपूर बायपास परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली.
रविकुमार तुकाराम दराडे (वय २०, रा. कराड नगर, अहमदपूर) व सागर दिलीप ससाने (२०, रा. फतेपूरनगर, अहमदपूर) अशी मयत दोघा युवकांची नावे आहेत. अहमदपूर येथील रविकुमार दराडे व सागर ससाने हे दोघे नातेवाईकांना हैदराबाद येथे पाठविण्यासाठी लातूररोड रेल्वेस्टेशनवर कार (एमएच २४, एटी ९७७७) ने गेले होते. नातेवाईकांना रेल्वेमध्ये बसविल्यानंतर बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शिरुर ताजबंद मार्गे परतत होते. त्यांच्या कारच्या पुढे ट्रक (केए ३२, डी ०९६६) होता. दरम्यान, कारचालक रविकुमार दराडे याचा वाहनावरील ताबा सुटला आणि क्षणार्धात कार ट्रकच्या पाठीमागून घुसली. या भीषण अपघातात चालक रविकुमार दराडे व सागर ससाने या दाेघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले, पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी ट्रकचालक मुनीर चुन्नुमिया पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि. श्रीमंगले हे करीत आहेत.
क्रेनच्या सहाय्याने कार काढली बाजूला...
कारचा वेग अधिक होता. त्यामुळे ती ट्रकच्या पाठीमागून घुसली. त्यात कारचा चक्काचूर झाला. अपघातामुळे ट्रकची पाठीमागील दोन्ही चाके तुटून रस्त्यावर पडली होती. ट्रकखाली अडकलेली कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढावी लागली.
मयत दोघेही अविवाहित...
मयत रविकुमार दराडे व सागर ससाने हे दोघेही अविवाहित आहेत. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. मृतदेह पाहून आक्रोश करण्यास सुरुवात केली.