लसीकरणाची गती वाढेना; अनेक सेंटर बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:25+5:302021-05-07T04:20:25+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटवर्कर, आरोग्यसेवक, ४५ ते ६० वयोगट, ६० वर्षांच्या पुढील आणि १८ ते ४४ वयोगटांत २ लाख १ ...

लसीकरणाची गती वाढेना; अनेक सेंटर बंद !
जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटवर्कर, आरोग्यसेवक, ४५ ते ६० वयोगट, ६० वर्षांच्या पुढील आणि १८ ते ४४ वयोगटांत २ लाख १ हजार ५०६ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस ३४ हजार ७९० जणांनी घेतला आहे. दोन्ही डोस मिळून २ लाख ३४ हजार २९७ आहेत. या सर्व वर्गवारीमध्ये जिल्ह्यात लाभार्थीसंख्या जवळपास १७ लाखांच्या आसपास आहे. आतापर्यंत फक्त दोन लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. याची टक्केवारी केवळ ११.७७ टक्के आहे. पालकमंत्र्यांनी शंभर दिवसांत पूर्ण लसीकरण करण्यासंदर्भातचा आराखडा तयार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. परंतु, केंद्र शासनाकडून लसीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शंभर दिवसांत लसीकरण कसे पूर्ण होणार, असा प्रश्न आहे. बुधवारी २४ हजार डोसेस उपलब्ध झाले होते. यातील १२ हजार ९०० डोसेस कोविशिल्डचे ४५ वर्षांच्या पुढील वयोगटासाठी होते. तर १२००० डोसेस कोव्हॅक्सिनचे होते. १८ ते ४४ वयोगटासाठी देण्यात आले आहेत. ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी मिळालेले बारा हजार डोसेस गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावी लागली. १८ ते ४४ वयोगटात मात्र १२ हजार डोसेस पुढील सात-आठ दिवस पुरतील. कारण, एका केंद्रावर दररोज शंभर डोस देण्याचे नियोजन आहे. या वयोगटासाठी जिल्ह्यात एकूण नऊ केंद्र आहेत. दररोज शंभर याप्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लाभार्थ्यांना बोलाविले जाते. त्यामुळे हा साठा दहा ते बारा दिवस पुरेल.
असे झाले आतापर्यंत लसीकरण
वर्गवारी पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १८४१४ १०५४०
फ्रंटलाईन २४२७१ ६५१७
४५ ते ६० वयोगट ५७५४९ ७१५४
ज्येष्ठ नागरिक ९७९८८ १०५७९
१८ ते ४४ ३२८५ ००
एकूण २,१,५०७ ३४,७९०
जिल्ह्यात १५ हजार डोस देण्याची क्षमता
जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे दररोज १५ ते २० हजार डोसेस दररोज देण्याची क्षमता आहे. प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी शासनाच्या संस्थांसह खासगी रुग्णालयांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. यातील अनेक केंद्रांवर कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे जिल्ह्यात १७१ लसीकरण केंद्र आहेत. प्राथमिक उपकेंद्रांवरही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, लस नसल्यामुळे सदर केंद्र बंद आहेत. मागणी तसा पुरवठा झाला तर दररोज १५ ते २० हजार डोसेस देण्याची क्षमता जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे आहे. त्यामुळे शंभर दिवसांत पूर्ण लसीकरण होऊ शकते. फक्त लसीचा पुरवठा होणे आवश्यक आहे.